दहा वर्षांनंतर शिवसैनिक व उमेदवार भाऊसाहेब वाकचाैरे यांचे अखेर मनाेमिलन

0
1607

शिवसैनिकांच्यावरील गुन्हे मागे घेतले नसल्याची खंत- कतारी

शिवसैनिकांना न्यायालयीनबाबीत संपूर्ण सहकार्य करण्याचे वाकचौरेंचे आश्वासन

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – 2014 साली शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेल्या तत्कालीन खा. भाऊसाहेब वाकचौरे व संगमनेर येथील कडवट शिवसैनिकांचे वाद विकोपाला गेले होते. पक्षासोबत गद्दारी केल्याचा जाब अमर कतारी, भाऊसाहेब हासे व अन्य शिवसैनिकांनी भर रस्त्यात विचारत शिवसेना स्टाईलने राज्यभरात गदारोळ निर्माण केला होता. वादाचे पर्यावसन एवढे विकोपाला गेले की, वाकचौरे यांच्या शिवसेनेत झालेल्या घरवापसीनंतर देखील गेल्या दहा वर्षापासून शिवसैनिक कोर्टाच्याफेर्‍या मारत राहिले, तेव्हा आधी शिवसैनिकांच्यावरील गुन्हे मागे घ्या, तरच प्रचार करू असे तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक उघड भूमिका घेत होते.


बुधवारी संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. संगमनेर सत्र न्यायालयात मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांतर्फे निषेध म्हणून एक चुकीच्या पद्धतीचे आंदोलन केले होते. सदर गुन्ह्यात क्लिनचिट कशी मिळेल, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आ. थोरात यांनी मनाचा मोठेपणा दाखवत व शिवसैनिकांना एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला. त्याबद्दल या सभेत शिवसेनेच्या अमर कतारी यांनी जाहीर आभार व्यक्त करत मनोगत केले.
मात्र स्वतःच्या पक्षातील उमेदवाराने शिवसैनिकांच्यावरील गुन्हे मागे घेतले नसल्याची खंत बोलून दाखवली. सभा संपताच युवासेना तालुकाप्रमुख अक्षय रावसाहेब गुंजाळ यांनी मध्यस्थी करत सामंजस्याची भूमिका घेत माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे तसेच शिवसैनिक अमर कतारी आणि अन्य सहकार्‍यांना सोबत घेत माजी तालुकाप्रमुख रावसाहेब दादा गुंजाळ यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे मनोमिलन घडवून आणले. त्यानंतर शिवसैनिकांना न्यायालयीनबाबीत संपूर्ण सहकार्य करायचे आश्वस्त करत वाकचौरे यांनी अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. तर शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी एकत्रितपणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाकचौरे यांचा प्रचार करुन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा शब्द दिला. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here