पतसंस्था क्षेत्रात नवा विक्रम
ठेवीही पोहोचल्या दोनशे कोटींच्या पार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 4 कोटी 87 लाखांचा निव्वळ नफा मिळवताना नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर संस्थेने दोनशे कोटींच्या ठेवींचे उद्दिष्टही पूर्ण केले असून 358 कोटींच्या व्यवसायासह तब्बल 154 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केल्याने संगमनेरच्या व्यापार क्षेत्रात चैतन्यही निर्माण केले आहे. संचालक मंडळाने केलेली प्रमाणिक कर्जदारांची निवड आणि ठेवीदारांचा संस्थेवरील अतुट विश्वास या बळावर संस्था प्रगतीच्या दिशेने घोडदौड करीत असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीष मालपाणी यांनी व्यक्त केली आहे.
संगमनेरच्या व्यापार क्षेत्रातील छोट्या व्यवसाय व उद्योगांना पाठबळ देण्यासाठी तीन दशकांपूर्वी शारदा नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या कालावधीतील संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतीसाठी समर्पित भावनेतून काम करताना ग्राहकाभिमुख सेवांवर अधिक भर दिला. अवर्षणग्रस्त तालुक्याच्या कार्यक्षेत्रात काम करताना संस्थेने सुरुवातीपासूनच व्यापार उदीमाच्या भरभराटीसाठी कर्जरुपी योगदान दिले. संचालकांनी प्रमाणिक कर्जदारांची निवड करण्यासह सभासद व ठेवीदारांमध्ये विश्वास निर्माण केल्याने अवघ्या तीन दशकांतच संस्थेने ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेला.
जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने 31 मार्च अखेरीस 203 कोटी 53 लाख रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले असून 154 कोटी 51 लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. 261 कोटी 17 लाखांचे खेळते भागभांडवल असलेल्या या संस्थेचा एकूण व्यवसाय 358 कोटी रुपये इतका आहे. 97 कोटी 12 लाखांची गुंतवणूक आणि 27 कोटी 67 लाखांचा स्वनिधी असलेल्या शारदा पतसंस्थेची थकबाकी शून्य टक्के आहे. सभासद, ठेवीदार, प्रामाणिक कर्जदार आणि ग्राहकांच्या पाठबळावर लवकर संस्था स्वमालकीच्या आधुनिक इमारतीत स्थलांतरीत होणार आहे.
संस्थेच्या संस्थापकांनी रुजविलेल्या नीतिमूल्यांवर यापुढेही कार्यरत राहुन संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा मनोदय यावेळी मावळते चेअरमन राजेश लाहोटी व रोहित मणियार यांच्यासह संचालक मंडळातील डॉ. योगेश भुतडा, कैलास आसावा, सी. ए. संकेत कलंत्री, सुमित आट्टल, राजेश रा.मालपाणी, कैलास राठी, अमर झंवर, विशाल पडताणी, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदीश टोकसे, सोमनाथ कानकाटे, तज्ज्ञ संचालक लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे यांच्यासह व्यवस्थापक माधव भोर, सहाय्यक व्यवस्थापक विलास सांगळे, वसुली अधिकारी संतोष गोयल, विशाल बोबडे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे.