
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील मिरपूर शिवारात एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी चोरून दुचाकीवरून धूमस्टाईलने पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता. 3) भर दुपारी एक वाजता घडली.
रंजना मारुती उंबरकर (वय 56, रा. उंबरी बाळापर ही महिला मिरपूर शिवारातील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनात येऊन बसत होत्या. याच दरम्यान दोघे चोरटे दुचाकीवरून आले आणि महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोन्याचे मोठे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण, असे एकूण साडेपाच तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावत चोरून दुचाकीवरून धूमस्टाईलने पोबारा केला. याप्रकरणी रंजना उंबरकर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरदुपारी महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याने भीतीचे वातावरण पसरले असून पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
