
दुरावस्थेकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तहसील कार्यालय आवारात तहसील कार्यालयाबरोबरच इतरही काही शासकीय कार्यालये असून पोलीस व महसूल कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे या आवाराची अस्वच्छतेमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. अस्थव्यस्थ पार्कींग, पकडलेल्या गाड्या तसेच सर्वच मजल्यावरील स्वच्छता गृहात दुर्गंधी पसरली आहे. कार्यालयाला तीन प्रवेशद्वार असून त्यापैकी एक प्रवेशद्वार कायमचे बंद करण्यात आले आहे. त्या संदर्भात संगमनेरातील वकील सैफुदीन शेख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे वकील शेख यांनी गुरुवारी (दि.21) रजिस्टर पोस्टाने तक्रार पत्र पाठविले आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून तहसील कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधली. तहसील कार्यालयाच्या आवारात शहर पोलिस ठाणे, सहदुय्यम निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय या शासकीय कार्यालयांबरोबर कारागृह देखील आहे.
महसूल विभागाने गौण खनिजाची कारवाई दरम्यान जप्त केलेली वाहने येथील एका प्रवेशद्वारा समोरच उभी केल्याने हे प्रवेशद्वार कायमचे बंद झाले आहे. त्यामुळे तेथील स्वच्च होत नसल्याने त्या भागात प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता पसरली आहे. महिला आणि पुरुषांसाठी सर्वच मजल्यांवर स्वतंत्र स्वच्छता गृह असून त्याची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने तेथेही मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथे येणार्या नागरीकांची गैरसोय होत आहे. तहसीलदार त्याचबरोबर संबंधीत वरिष्ठ अधिकार्यांचे याकडे कोणतेही लक्ष नाही. त्यामुळे या शासकीय कार्यालयाच्या दुरावस्थेकडे आपण लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.





















