नॅशनल जिम्नॅस्टिक स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक
युवावार्ता – संगमनेर ( प्रतिनिधी ) – संगमनेरची कन्या सौम्या महेश भोर हिने अमेरिका येथे झालेल्या नॅशनल जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये नुकतेच सुवर्णपदक मिळवले आहे. सौम्याचे वडील महेश सुभाष भोर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिका येथे आयटी क्षेत्रात काम करत आहेत.
जुलै 2023 मध्ये ओरलांडो वर्ल्ड सेंटर, फ्लोरिडा येथे अॅमचर ऍथलेटिक युनियन या संस्थेअंतर्गत जिम्नॅस्टिक ही स्पर्धा घेण्यात आली होती. अकरा वर्ष वयोगटामध्ये सर्व राज्यातील मिळून 76 स्पर्धकांनी या खेळात भाग घेतला होता. एकूण चाळीस गुणांपैकी सौम्या हिला 39.07 इतके गुण मिळाले. फ्लोअर रुटीन मध्ये तिला दहा पैकी दहा गुण मिळाले. या स्पर्धेमध्ये फ्लोअर रुटीन, वॉल्ट आणि इतर राऊंडमध्ये सौम्याला तीन सुवर्णपदक तर बार आणि बीम मध्ये दोन रोप्य पदक मिळाले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या या नॅशनल जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये ती पुन्हा भाग घेणार आहे. गेल्या दोन वर्षापासून सौम्या जिम्नॅस्टिक या खेळाची तयारी करत असून ती यावर्षी राष्ट्रीय संघाची सदस्य आहे.
अॅमचर अथलेटिक युनियन ही संस्था अमेरिकेमध्ये 1888 साली स्थापन झाली असून गेल्या शंभर वर्षांपासून विविध प्रकारच्या स्पर्धा ते भरावीत असतात. ही संस्था अमेरिकेमधील शारीरिक स्पर्धा भरविणारी सर्वात मोठी संस्था असून यामध्ये सात लाख वीस हजार पेक्षाही जास्त सदस्य आहेत. 45 खेळांमध्ये भरणाऱ्या स्पर्धेत दीड लाख स्वयंसेवक आहेत. ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. 1996 मध्ये वर्ल्ड डिज्नी वर्ल्ड बरोबर करार झाल्यानंतर ही संस्था ओरलँडो, फ्लोरिडा येथे स्थलांतरित झाली. फुटबॉल, बॅडमिंटन, बेसबॉल, हॉकी हॉलीबॉल, सॉकर, स्विमिंग, कराटे, जिम्नॅस्टिक यासारख्या 45 खेळांसाठी ही स्पर्धा भरवली जाते. सौम्याचे वडील महेश सुभाष भोर हे केवळ सॉफ्टवेअर इंजिनियर नसून उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. सौम्याची आई सुप्रिया भोर या सुद्धा उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. सौम्याचे काका सचिन भोर, प्रशांत भोर, काकी प्रियदर्शनी भोर हेही फोटोग्राफर असून विवाह फोटोज, फोटोआर्टिओ अकॅडमी ऑफ फोटोग्राफी आर्ट याचे ते संचालक आहेत. सौम्याच्या यशाबद्दल तिचे संगमनेर तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.