दैनिक युवावार्ता
संगमनेर (प्रतिनिधी) महेश खुळे –
तालुक्यातील राजकिय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या मालदाड ग्रामपंचायत सरपंचाकडून मनमानी पध्दतीने कारभार करत असल्याने तसेच गावात शिक्षण क्षेत्रात राजकारण व हस्तक्षेप करत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत आपला निषेध व्यक्त केला.
मालदाड ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. प्रगतशील ग्रामपंचायत असून या गावात अनेक सोयी सुविधा देखील आहेत. परंतू ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असलेल्या गोरक्षनाथ नवले यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात होणार्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. ग्रामसभेच्या ठरावानुसार कामकाज न करणे, मंजूर निधीचा परस्पर व मनमानी पध्दतीने वापर करणे. आदींबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्यांकडे निवदेनाव्दारे केल्या होत्या.
गावातील ग्रामस्थांना रहिवासी दाखला न देणे, कागदपत्रांची अडवणूक करणे, शासकीय कामासाठी पैश्यांची मागणी करणे आदी अनेक आरोप त्यांच्यावर ग्रामस्थांकडून केले जात आहे. गावात असणार्या जिल्हा परिषद शाळेत शाळेला खोली मंजूर असतानाही बांधकामास परवानगी नाकारणे, शाळेस शैक्षणीक सुविधा उपलब्ध न करुन देणे. शिक्षकांवर राजकिय दबाव आणणे, शैक्षणीक कार्यात अडथळा निर्माण करणे असे प्रकार वारंवार केले जात असल्याने संपूर्ण गावातील नागरिकांचा रोष ग्रामपंचायत व सरपंचावर व्यक्त केला जात होता.
याबाबत गावातील ग्रामस्थ, शिक्षक, महिला यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार आज या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत सरपंचाच्या गैर व मनमानी कारभाराप्रकरणी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. याप्रसंगी गावातील महिला व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.