
नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी संघर्ष तीव्र करा : आ. सत्यजित तांबे
तरुण-विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा केवळ प्रकल्प नसून तो या परिसरातील नागरीकांचा हक्क आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आता संघर्ष अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असा ठाम निर्धार व्यक्त करत लोकप्रतिनिधी आ. सत्यजित तांबे यांनी या मागणीला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.
या बाबत आ. सत्यजित तांबे यांनी आवाहन करताना म्हटले आहे की, नाशिक–पुणे दरम्यान सरळ मार्गाने सेमी हायस्पीड रेल्वे सुरू व्हावी, यासाठी ही लढाई एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढली जात आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळात प्रतिनिधी म्हणून सातत्याने आवाज उठवण्यात येत असून, प्रशासकीय स्तरावरही नियमित पाठपुरावा सुरू आहे. या विषयावर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना एकत्र करून मुख्यमंत्री महोदयांकडे ठामपणे मागणी मांडण्यात येत आहे.

मात्र, या लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळवायचे असेल, तर तिला ‘जनआंदोलन’चे व्यापक रूप देणे अत्यावश्यक आहे. विशेषतः ज्या तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, त्यांनी या आंदोलनात अग्रस्थानी राहावे, असे आवाहन आ. तांबे यांच्याकडून करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर तरुणांनी व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्रांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पत्राचा नमुना उपलब्ध करून देण्यात येणार असून, जास्तीत जास्त संख्येने ही पत्रे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवून नाशिक–पुणे रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी, यासाठी आपला लढा बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“अभी नहीं… तो कभी नहीं!” हा संदेश देत, आता नाही तर कधीच नाही, या भावनेतून संगमनेरकरांनी एकजूट दाखवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठीचा हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर असून, लोकसहभागातूनच तो यशस्वी होईल, असा विश्वास आ. तांबे यांनी व्यक्त केला आहे.


















