संगमनेरमध्ये गुन्हेगार टोळी गजाआड

0
3217

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शहरातील अकोले नाका व परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना त्रस्त करणार्‍या गुन्हेगारांच्या टोळीवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत सात जणांच्या टोळीला जेरबंद केले. ही टोळी वारंवार लुटमार, मारहाण, छेडछाड आणि दहशत निर्माण करत होती. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार राबवलेल्या या मोहिमेत या आरोपींकडून 1.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोले नाका परिसरात नागरीकांवर दहशत निर्माण करणार्‍या या टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरदस्ती, अपहरण, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पुढील गुन्ह्यांचा समावेश आहे – गु.र. नं. 327/2025 : जबरदस्ती व मारहाणीचे प्रकार बीएनएस कलम 109, 118(2), 118(1), 352 इ.), गु.र. नं. 302/2025 : खुनाचा प्रयत्न, गु.र. नं. 364/2025 : अपहरण, गु.र. नं. 406/2025 आदी गंभीर गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या आरोपींकडून देवमूर्ती, दिवटे, तांबे व पूजा साहित्य – 13,000, दोन दुचाकी (Honda Shine and HF Deluxe) – 1,20,000, Vivo मोबाईल Y300 – 20,000, रोख रक्कम – 2,150, चाकू, चॉपर, काठ्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोसई समीर अभंग, पोसई संतोष पगारे यांच्यासह पोलीस पथकाने केली. विशेष तपास पथकात पोकॉ संदीप शिरसाठ, अजित कुर्‍हे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, हरिश्‍चंद्र बांडे यांचा सहभाग होता. या आरोपींनी महिलांची छेडछाड, पादचार्‍यांवर हल्ले, नागरिकांना धमकावणे, पोलिसांनाही आव्हान देणे अशा अनेक घटना घडवून आणल्या होत्या. त्यांच्यावर पूर्वी किरकोळ कारवाया झाल्या पण कठोर कारवाईचा अभाव होता. त्यामुळे या टोळीची हिंमत दिवसेंदिवस वाढत होती. अखेर नागरिकांच्या दबावामुळे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी निर्णायक पावले उचलली. या कारवाईचे नागरीकांकडून स्वागत होत आहे. शहरातील इतर भागातही वाढती गुन्हेगारी, चोर्‍या याकडे देखील पोलीसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या आरोपींवर पुढील कठोर कारवाई, मोक्का, तडीपार यासारख्या स्वरूपात होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here