शिवजयंती कुणाची, संगमनेरात रंगला श्रेयवाद ?

0
19

एकाच जागेवर दोन गटाचा दावा, तिसरा अलिप्त

राजकीय परिवर्तनानंतर संगमनेरात वाढतोय तणाव

तारखेची शिवजयंती आणि तिथीचीही शिवजयंती आम्हीच करणार, काँग्रेसचा शिवजयंतीशी काहीही संबंध नाही. शिवजयंती आमचीच, जागाही आमचीच, सरकारही आमचेच, अशी आडमुठी भुमिका शिवसेना व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली. तर दुसरीकडे शिवजयंती उत्सव समिती व संगमनेरकरांनी यावेळी आम्ही नियोजन केले असून आम्हाला संधी द्या अशी मागणी प्रशासनाकडे केली. ठाकरे गटाच्या पारंपारिक मिरवणूकीलाही शिंदे गटाने आक्षेप घेत आम्हीच मिरवणूक काढणार अशी भुमिका घेतली. यामुळे शिवजयंती सोहळ्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तारखेची शिवजयंती जर महायुतीने केली असेल तर ही शिवजयंती संगमनेरकरांना करून द्यावी अशी सार्वत्रिक भावना नागरीकांची आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – चाळीस वर्षांनंतर संगमनेरात राजकीय परिवर्तन झाले आहे. जनतेने हे परिवर्तन नेमके का आणि कशासाठी केले, यातून बोध घेऊन आपण जनतेची सेवा केली पाहिजे याचा विचार न करता संगमनेरात सध्या दोन गटात आणि दोन विचारधारेत संघर्ष पेटला आहे. तारखेनुसार झालेल्या शिवजयंती सोहळ्यात एका गटाने काहीशी माघार घेतल्यानंतर दुसर्‍या गटाने मोठ्या जल्लोषात ही शिवजयंती साजरी केली होती. परंतु आता दुसर्‍या गटाने तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीची जोरदार तयारी केली असताना पुन्हा पहिल्या गटाने अरेरावी करत आम्हाला देखील पुन्हा याच ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचा अट्टाहास धरत बसस्थानकासमोरील जागेवर दावा केला. हा वाद सुरू असतानाच एका गटाने रविवारी याच जागेवर मंदिराची प्रतिकृती बांधण्यासाठी भूमीपूजन केले. आणि पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले. रात्री शेवटपर्यंत तडजोड न झाल्याने दुसर्‍या गटाने शेजारीच अतिक्रमण करून आपला सावतासुभा उभारला. त्यामुळे पोलिसांनी या जागेचा ताबा घेत सध्या तरी दोन्ही गटाला शांत केले आहे. तर तिसरा गट जो पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करतो तो मात्र या वादातून अलिप्त राहत स्वतंत्रपणे आपली तयारी सुरू केली आहे. परंतु या राजकीय वादात सर्वसामान्य जनता होरपळत असून आधिच छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या राजकीय प्रेमातून राज्यात वादंग सुरू असताना संगमनेरात जयंती वरुन वादातून संघर्ष पेटून छत्रपती शिवाजी महाराज हेच आता या राजकारणात एकप्रकारे कैद झाले आहे.

19 फेब्रुवारी शासकीय शिवजयंती आणि तिथीनुसार यावेळी 17 मार्च रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यापुर्वी हिंदूत्ववादी संघटनां व पक्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करीत होते. परंतु यावेळी महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेत महायुतीने 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्वाभिमानी संगमनेरकरांनी देखील शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते परंतु महायुती आक्रमक झाल्याने त्यांनी काहिशी माघार घेत तिथीनुसार जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी बसस्थानक आगार प्रशासनाला पत्र देखील दिले. आणि त्यानंतर शहर बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर रविवारी दुपारी आ. सत्यजित तांबे यांनी नियोजित मंदिर प्रतिकृतीचे भूमीपूजन केले. आणि सदर जागा आरक्षित केली. या गोष्टीची भनक लागताच महायुतीचे कार्यकर्ते बसस्थानकासमोर जमा झाले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने व एकाच जागेवर दावा करू लागल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरिक्षक देविदास ढुमणे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान पोलीस प्रशासन यंत्रणा राजकीय दबावापुढे झुकून आमच्यावर अन्याय करीत असल्याची भावना यावेळी स्वाभिमानी संगमनेरकर नागरीक या नवाखाली जयंती करणार्‍या नागरीकांनी व्यक्त केली आहे.
स्वाभिमानी संगमनेर तालुका शिवजयंती उत्सव समिती व तालुक्यातील सर्व संघटनांच्या वतीने एकत्रित महाराजांचे भव्य मंदिर उभारून शिवजयंती साजरी होणार आहे. याचा प्रारंभ आमदार सत्यजित तांबे, विश्‍वासराव मुर्तडक, सोमेश्‍वर दिवटे, खंडू सातपुते, गणेश मादास, किशोर टोकसे, निखिल पापडेजा, सतिष आहेर, गजेंद्र नाकील यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

दरवर्षी संगमनेर बस स्थानक परिसरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य जयंती साजरी होत असते. तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांचे भव्य मंदिर उभारून ही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर भव्य मिरवणूक, आतिषबाजी, 600 खेळ, विद्युत रोषणाई, यांसह मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून ही जयंती अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे.
यावेळी आ. सत्यजित तांबे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे दैवत आहे. त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. यावर्षी संगमनेर बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या मंदिराचा देखावा उभारण्यात येणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नगरपालिकेने संगमनेर शहरात अश्‍वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला यासाठी आपण पाठपुरावा केला आणि संगमनेर बस स्थानकावर जागा मिळवली.
या अश्‍वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा शहरांमध्ये उभारला जाणार आहे. याचबरोबर समनापूर येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांची बारव पुनर्बांधणी करून ते ही स्मारक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here