बंद बंगला फोडून धाडसी चोरी

0
974

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – घरमालक बाहेरगावी फिरायला गेल्याची नामी संधी साधून बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाची उचकापाचक करून रोख रक्कम, किमती वस्तू, दागिने असे सुमारे 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना येथील शहरानजीक असणार्‍या शंकर टाऊनशिप, घुलेवाडी येथे घटना दोन डिसेंबर रोजी घडली आहे.
याबाबत दीपक श्रीरामजी बजाज (रा. जिव्हाळा, शंकर टाऊनशिप साई श्रध्दा चौक, घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी 1 डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह मुळ गावी गेलो होतो. दरम्यान दोन डिसेंबर रोजी रात्री चोरट्यांनी बंद बंगल्याचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सेप्टी दरवाज्याचे देखील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटासह सामानाची उचकापाचक केली. आत ठेवलेले रोख रक्कम, चांदीचे भांडे, पैंजण, टायटन घड्याळ, इमीटेशन ज्वेलरी, स्पीकर, महागडी साडी असा एकूण 22 हजारांचा (पोलिस दरबारी नोंद) मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे करीत आहेत.
दरम्यान संगमनेरात चोरांचा धुमाकूळ अद्याप थांबलेला नाही. वाहन चोरी, घरफोडी, लुटमार या घटनांनी नागरिक भयभीत आहेत. शहर पोलिस ठाण्यात असंख्य गुन्हे दाखल होतात, तपास मात्र कागदावरच आहे. बुधवारी शहर पोलिसांनी एका चोरट्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या त्याचा मोठा गवगवा झाला. मात्र अजूनही असंख्य गाड्या शहरातून गायब आहेत. कित्येक तोळे सोने महिलांच्या अंगावरून चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे. त्याचाही तपास शांत आहे. तपास होत नसल्याने तसेच त्यासाठी फिर्यादीला पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत असल्याने अनेक जण फिर्याद देण्यास देखील टाळाटाळ करतात. तर चोरी गेलेल्या वस्तू तुमच्याच आहे का, त्यांच्या पावत्या आहे का, त्यांची किंमत येवढी कशी असे अनेक प्रश्‍न तपासी अंमलदाराकडून विचारले जातात. त्यामुळे ती फिर्याद नको आणि कटकट पण नको. अशी सर्वसामान्य नागरिकांची व्यथा आहे. अनेकवेळी स्वत;ची पाठ थोपटून घेणार्‍या पोलीसांना वाढत्या चोर्‍या रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here