सभासद, ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये – चेअरमन
संगमनेर (प्रतिनिधी)
येथील नामांकित राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेमध्ये आर्थिक अपहार झाल्याच्या चर्चेने सभासद, ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. ठेवीदारांनी आपल्या ठेवींची रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेसमोर काल शुक्रवारपासून मोठी गर्दी केली आहे. मात्र पतसंस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार झाला नसून पतसंस्था सक्षम असल्याचा दावा पतसंस्थेकडून करण्यात आला आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन चेअरमन नंदनमल बाफना यांनी केले आहे.
संगमनेर शहरातील जाणता राजा मार्गावर असणार्या या पतसंस्थेत गडबड झाल्याची अफवा शहरात वार्यासारखी पसरली. यामुळे भयभीत झालेल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवींची रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेसमोर मोठी गर्दी केली होती. ठेवी काढण्यासाठी गर्दी केल्याने पतसंस्थेचे चेअरमन व उपनिबंधक सहकारी संस्था यांनी तातडीने निवेदन प्रसिद्ध करून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नय असे आवाहन केले.
पतसंस्थेकडून जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर ही संस्था सहकार कायद्याअंतर्गत नोंदणी केलेली संस्था असून सदर संस्थेचे कार्यक्षत्र संपूर्ण जिल्हा आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगल्या स्वरुपात असून संस्थेकडे दिनांक 31 मार्चअखेर एकूण ठेवी रु.136 कोटी 5 लाख, कर्ज वाटप रु.118 कोटी 99 लाख असून त्यापैकी सोनेतारण कर्ज रु.70 कोटी 75 लाख इतके वाटप केलेले आहे. संस्थेचा राखीव निधी रु. 5 कोटी 49 लाख, एनपीए गुंतवणूक रु. 3 कोटी व इतर बँकेमध्ये गुंतवणूक असून सर्व गुंतवणूक मिळून रु. 35 कोटी 4 लाख इतकी असून संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे कुणीही बोगस, बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व लगेच ठेवी काढण्यासाठी संस्थेत गर्दी करू नये.
आनंदऋषीजी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. अज्ञातांकडून संस्थेबाबत गैरसमज पसरविण्यात येत असल्याने पतसंस्थेसमोर अडचण निर्माण झाली आहे परंतू आमचे सर्व सभासद, ठेवीदार, सुज्ज्ञ असून त्यांचा संस्थेवर विश्वास आहे. मात्र ठेवीदार एकदम ठेवी परत मागण्यास आल्यास त्या परत करणे कोणत्याही संस्थेला अशक्यप्राय आहे. या संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असून संस्था प्रगतीपथावर आहे. सर्व व्यवहार सुरक्षित व सुरळीत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन चेअरमन नंदनमल बाफना, राजकुमार गांधी, उपनिबंधक संतोष कोरे यासह संस्थेच्या संचालकांनी केले आहे.