फेस्टिवलचे दुसरे पुष्प; भरगच्च उपस्थितीत अवतरला सिनेसंगीताचा सुवर्णकाळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -संगमनेर फेस्टिवलचा दुसरा दिवस संगीत रसिकांना अविस्मरणीय मेजवानी देणारा ठरला. या कार्यक्रमातून जुन्या-नव्या गाजलेल्या चित्रपटगीतांचे सादरीकरण झाले. प्रत्येक गीताला साजेशे संगित आणि आकर्षक प्रकाशयोजनेमुळे आजचा कार्यक्रम संगमनेरकर कलारसिकांना चंदेरी दुनियेच्या सुवर्णकाळाची सफरच घडवून गेला.
प्रसिद्ध गायक कलाकार हिम्मतकुमार पंड्या आणि त्यांच्या सहकार्यांनी मालपाणी लॉन्सच्या अलिशान रंगभूमीवर सादर केलेल्या ‘बॉलीवूड म्युझिकल धमाका ऑर्केस्ट्रा’ने गाण्याच्या सोबतच लावणी आणि वेस्टर्न डान्सच्या दिलखेचक पेशकारीमुळे उपस्थितांना ठेका धरून नाचायला भाग पाडले.वाद्यवृंदाने कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने केली. त्यानंतर सेक्साफोनवर ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ हे प्रचंड गाजलेले गीत सादर करून गायकाने रसिकांच्या मनाचा ताबा घेतला. त्यानंतर एकाहून एक सरस मराठी-हिंदी सिनेगीतांचा खजिनाच रसिकांसाठी कलाकारांनी खुला केला. प्रचंड गाजलेल्या ‘अगंबाई अरेच्चा’ चित्रपटातील ‘मन उधाण वार्याचे’ हे गीत अक्षय मोहिते यांनी सुंदर सादर केले.
तसेच ‘दिस चार झाले मन, पाखरू होऊन’ आणि ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ ही गाणी सादर करून भक्ती देशपांडे यांनी कार्यक्रमाची उंची वाढविली. बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील अनुक्रमे ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू..’ आणि ‘तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना’ ही गीते हिम्मतकुमार पंड्या यांनी थेट प्रेक्षकांमध्ये उतरून सादर करीत कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सुमारे अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध करून जागीच खिळवून ठेवले.
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी संगमनेर फेस्टिव्हलला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. उभयतांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष व संगमनेर फेस्टिवलचे प्रणेते मनीष मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष ओम इंदाणी, सचिव आनंद लाहोटी, प्रणित मणियार, सुमीत अट्टल, सम्राट भंडारी, प्रतिक पोफळे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केले होते.