प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत त्याचबरोबर शासनाने रोजगार वाढीसाठी प्रयत्न करावेत
युवावार्ता (प्रतिनिधी)
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील इंडियाबुल्स प्रकल्पाची जागा एमआयडीसीला परत देण्याबाबत, तसेच नाशिक सह राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतींतील प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक पदवीधरचे आ. सत्यजित तांबे यांनी ही जागा सदर कंपनीकडून तात्काळ परत घ्यावी व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावेत त्याचबरोबर शासनाने रोजगार वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
सिन्नर तालुक्यामध्ये मोठा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून इंडियाबुल्स कंपनीच्या ताब्यात आहे. या भूखंडावर कंपनीने कोणताही उद्योग उभा न केल्याने उत्तर महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. हा भूखंड इतर कंपन्यांना मिळावा, याठिकाणी उद्योगधंदे निर्माण व्हावेत व तरुणांसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी गेल्या एक वर्षापासून आ. सत्यजीत तांबे सातत्याने लढा देत आहे. या बैठकीतही इंडिया बुल्स कंपनीला दिलेली जमीन लवकरात लवकर परत घ्यावी, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. युवकांच्या रोजगारासाठी सुरू असलेला हा लढा आपण यापुढेही लढत राहू असे आ. तांबे यांनी म्हटले आहे.