दोन हजार मुलांना नोकरीच्या ऑर्डर्स , ४० नामवंत कंपन्यांचा सहभाग
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)
पारेगावच्या माळरानावर दोन वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. कंपनीच्या दुसऱ्या वर्धापनदिन दिनानिमित्त बाप कंपनीच्या सौजन्याने आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यात अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दोन हजार मुलांना यावेळी नोकरीच्या ऑर्डर्स देण्यात आल्या. ४० नामावंत कंपन्यांनी सहभाग यात घेतला.
महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, टाय ऑटोमोबाईल्स आदी कंपन्यांसह बैंकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय व अॅक्सिस बँकेने मेळाव्यात सहभाग घेतला. इन्शुरन्समध्ये केआर हेल्थ, मेडीकव्हर हायर, कल्याणी इत्यादी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक व नगर जिल्ह्यातील विद्यार्थी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारेगावच्या बाप कंपनीच्या सौजन्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले
अमेरिकेच्या केंब्रिजमध्ये शिकणार आहेत. सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम येथे माळरानावर २४ तास सुरू आहे. शेतकऱ्याची मुले येथे सॉफ्टवेअर तयार करतात. लवकरच संगमनेरला आयटी हब बनवणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब घुगे यांनी सांगितले. बाप संस्थेने शेती व्यवसायात देखील काम सुरू केले. “बाप”ने मालकिन नावाचे पशुखाद्य तयार केले. माफक दरात शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले. फूड प्रोसेसिंग यूनिट सुरू करणार आहोत, याचा शेतकऱ्यांना
मोठा फायदा होणार आहे. याशिवाय आरोग्याच्या क्षेत्रातही आम्ही मोठे काम उभे करत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या परिवारात सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची पूर्ण खात्री आम्ही देतो, असे रावसाहेब घुगे म्हणाले. यावेळी उद्योजक श्रीकांत दुबे म्हणाले, या परिसरात आम्हाला पाच एकर जागा मिळाल्यानंतर आम्ही येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग उभारणार आहोत. यावेळी भाऊसाहेब घुगे, दीपक नागरे, रामनाथ घुगे, लक्ष्मीबाई घुगे आदी उपस्थित होते. नोकरी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.