महिलेच्या गळ्याला हात घालत दोन तोळ्याचे मिनी गंठन तोडून धूम ठोकली.
संगमनेर (दैनिक युवावार्ता)
सोमवारी भर दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर महाविद्यालयासमोरुन एक महिला पायी जात होती. यावेळी अचानक समोरून भरधाव वेगाने आलेली दुचाकी या महिलेच्या जवळ येऊन थांबली. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणांने या महिलेच्या गळ्याला हात घालत तीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठन तोडून धूम ठोकली. या घटनेने भयभीत झालेल्या या महिलेने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत हे चोरटे पसार झाले होते.
याबाबत माहिती अशी की, शोभा संजय नवले रा. मालदाड ता. संगमनेर ही महिला संगमनेर महाविद्यालयासमोरुन जात होती. यावेळी एकटी महिला पाहून दुचाकीवर आलेल्या तरूणांनी डाव साधत ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे मिनी गंठन तोडून धूम ठोकली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अशा प्रकारे अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. परंतु त्याचा तपास अद्याप लागलेला नाही आणि अशा घटनांना आळा देखील बसत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.