उत्साहात विक्रमी मतदान, विजयाचे दोन्हींकडून दावे

0
719

तरूण आणि लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर विधान सभेसाठी यावेळी उत्साहात सुमारे 75 टक्के मतदान झाले. शहरासह ग्रामीण भागातल्या अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. यात लाडक्या बहिणीचा देखील मोठा सहभाग होता. तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहात, शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे व पोलीस प्रशासनाने दिली.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात सलग नवव्यांदा निवडणुकीला सामोरे गेले. महायुतीकडून युवा उमेदवार अमोल खताळ यांनी थोरात यांच्याशी लढत दिली. खताळ यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे तगडे पाठबळ असल्याने या दुरंगी लढतीत मतदानादरम्यानही ठिकठिकाणी चुरस जाणवली. तर या निवडणुकीत वंचित व मनसेचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. तालुक्यातील जोर्वे या आपल्या मूळ व शिर्डी मतदारसंघातील जोर्वे गावी थोरात यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. खताळ यांनी घुलेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान केले. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन तास मतदान प्रक्रिया संथ होती. त्यानंतर शहरातल्या बहुसंख्य आणि ग्रामीण भागातल्या मोठ्या गावांमध्ये मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या. असे असले तरी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी मतदान अवघे 34 टक्के झाले होते. ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी दुपारपर्यंत शेतातली कामे उरकण्यास प्राधान्य देऊन त्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी केली. त्यामुळे उत्तरोत्तर मतदानाची टक्केवारी वाढत गेली. यावेळी तरुणांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह असल्याचे विशेषत्वाने जाणवले. तसेच लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले असल्याने त्यांनीही मोठा उत्साह दाखवत मतदान केले.

This image has an empty alt attribute; its file name is job1.png

दरम्यान दोन्ही उमेदवारांचे शहरासह गावोगाव बूथ लागले होते. तेथून कार्यकर्ते अधिकाधिक मतदान घडवून आणण्यासाठी दिवसभर धडपडताना दिसले. थोरात यांची मोठी यंत्रणा आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी सक्रिय दिसून आली. विरोधी उमेदवाराच्या प्रचारात आणि मतदान प्रक्रियेदरम्यानही यापूर्वीच्या निवडणुकात विस्कळीतपणा दिसायचा, तो यावेळी दिसला नाही. मंत्री विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आपली यंत्रणा खताळ यांच्या मागे उभी केल्याने अगदी मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही यंत्रणा सतर्क होती. काहीही झाले तरी परिवर्तन घडवायचे असा चंग महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला दिसून आला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये सुमारे 72 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी तीन ते चार टक्के मतदान वाढले आहे. आजी-माजी महसूल मंत्र्यांत उफाळलेल्या मोठ्या संघर्षाचा परिणाम म्हणजे मतदानाची वाढलेली टक्केवारी असल्याचे मानले जाते. मतदानाची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार हे येत्या शनिवारी 23 तारखेला मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल. दोन्ही उमेदवार व समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येत असले तर एक मात्र खरं ही निवडणूक यापुर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी होती. कधी नव्हे तो विरोधकांनी संपूर्ण शक्ती लावत ही निवडणूक लढविली. निवडणूकी दरम्यान अनेक घटना या मतदार संघात घडल्या. सुजय विखे यांनी तयार केलेल्या खेळपट्टीवर अमोल खताळ यांनी तुफान बॅटींग केली. अतिशय अटी- तटीच्या झालेल्या या सामन्याच्या निकालाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here