निष्ठावान युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पोस्टने खळबळ

0
633

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील युवक काँग्रेसमध्ये काम करणार्‍या एका युवा कार्यकर्त्याच्या फेसबुक पोस्टमुळे संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. प्रामाणिकपणे काम करणार्‍या आणि तळागळातील लोकांशी संपर्क असणार्‍या युवा काँग्रेस पदाधिकार्‍याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. सत्ताबदलानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नेहमीच परवड होत असते, अडचणीच्या काळात नेत्यांनी पाठीशी उभे रहावे आपल्या भावना समजून घ्याव्यात अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असते परंतू त्यांचा अपेक्षाभंगच अधिक होतो अशी भावना त्या युवा कार्यकर्त्याने आपल्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
सदर कार्यकर्ता थोरात-तांबे परिवाराचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान परिषद, विधानसभा अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वस्व झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. ग्राऊंड लेव्हलला काम करणारा आणि तळागळातील कार्यकर्त्यांची मोट बांधणारा निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा अशा आशयाची पोस्ट टाकतो तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार हे मात्र नक्की.
काही तासानंतर या पदाधिकार्‍याने ही पोस्ट डिलीट केली आणि नंतर सारवासारव करत आपण पदाचा राजीनामा व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दिला आहे असे सांगितले. मात्र काँग्रेसचा कायमच एकनिष्ठ सदस्य असल्याचेही त्याने फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे या पोस्टला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या कमेंट नसून विरोधातील कार्यकर्ते सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसच्या वतीने शाखा स्थापन करण्यात आल्या. त्यावेळी शाखेच्या बोर्डवर पदाधिकार्‍यांची नावे टाकण्यात आली. दुसर्‍या दिवशी त्यातील काहींनी आपली नावे खोडली. अनेक वर्षांपासून सहकारी संस्थांवर आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखी हुकुमत गाजविणारे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याऐवजी त्या कशा वाढतील याचीच काळजी घेतात. हेच अधिकारी आता तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेतील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. याआधीही नेत्यांच्या कानात चुकीच्या गोष्टी सांगणारे हे अधिकारी आणि जवळचे कार्यकर्ते आमच्यासाठी नसल्यासारखे असल्याची खंत काँग्रेसच्याच दुसर्‍या एका पदाधिकार्‍याने व्यक्त केली आहे. ही फेसबुक पोस्ट करणार्‍या पदाधिकार्‍याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद होता मात्र एका फेसबुक पोस्टवरून त्याला व्यक्त व्हावे लागते याचा विसंवादाची दरी वाढत असल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here