आनंद इंगळे, डॉ.श्वेता पेंडसे, प्रशांत केणी, तनिषा वर्देंच्या अभिनयाने रसिक भारावले
संगमनेर, प्रतिनिधी
सोळाव्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी अखेरच्या दिवशी ‘नकळत सारे घडले’ या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणार्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष, जीवनशैलीतील तफावत आणि त्यातूनच निर्माण होणारी कौटुंबिक वादळं यातून कसा मार्ग काढावा यासाठी दोन पिढ्यांच्या समन्वयाचा मंत्र जाताजाता या नाटकाने प्रेक्षकांना दिला.
शेखर ढवळीकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेले आणि विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेले व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत संयोजनाने नटलेले हे नाटक संगमनेर फेस्टिव्हलच्या रंगभूमीवर सादर झाले. दूरदर्शनच्या मालिका, चित्रपट आणि नाटक असा सर्वत्र संचार असलेले नामवंत अभिनेते आनंद इंगळे, डॉ.श्वेता पेंडसे, प्रशांत केणी, तनिषा वर्दे या चारही कलावंतांच्या कसदार अभिनयाने या नाटकाला उंचीवर नेऊन ठेवले.
प्रत्येकाला आपल्या आसपासची कथा वाटेल असे या नाटकाचे कथानक होते. दुबईमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा राहुल शिकण्यासाठी मुंबईला मामाकडे असतो. एमबीए करणार्या राहुलला जगा वेगळे काही करावेसे वाटत असते. नाटक आणि चित्रपट क्षेत्राकडे त्याचा जबरदस्त ओढा असतो. एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर येते आणि तिच्या भाषणात ती राहुलच्या अभिनयाची प्रशंसा करते तिथपासून राहुलच्या डोक्यात सिनेमामध्ये करिअर करण्याचे खुळ घुसते. अर्थात ते मामाला अजिबात आवडत नाही आणि त्यातून उद्भवलेला वैचारिक संघर्ष कधी खटकेबाज संवादातून तर, कधी विनोदी टीकाटिप्पणीतून सुंदर साकारण्यात आल्यानं प्रेक्षकांनी वेळोवेळी टाळ्यांची भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात नाटकातील सर्व कलावंतांचे सत्कार करण्यात आले. संगमनेर फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी यावेळी छोटेखानी भाषण करताना सोळा वर्ष संगमनेर फेस्टिव्हल यशस्वी करण्यामागे संगमनेरातील विविध प्रायोजक, दानदाते आणि हजारो रसिकांचा भक्कम पाठिंबा कारणीभूत असल्याचे आवर्जून नमूद केले. पुढील वर्ष मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आगामी वर्षात अतिशय दिव्य स्वरूपात अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल असा संगमनेर फेस्टिव्हलचा नजराणा येथील रसिकांना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राजस्थान युवक मंडळाचे सुमारे दोनशे कार्यकर्ते व्यक्तिगत कामे विसरून तन-मन-धनाने फेस्टिव्हलसाठी योगदान देतात, त्याचप्रमाणे सलग सोळा वर्षे मालपाणी उद्योग समूहाने देखील आपला भरीव सहयोग देऊन संगमनेर फेस्टिव्हलची शान वाढविली असे सांगितले. यावेळी स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने, संगमनेर मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र कारभारी वाघचौरे, उपाध्यक्ष मुकेश कोठारी, मंडळाचे कार्याध्यक्ष ओम इंदाणी, सचिव आनंद लाहोटी, प्रणित मणियार, सम्राट भंडारी, वेणुगोपाल कलंत्री, कृष्णा असावा, रोहित मणियार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.