संगमनेरमध्ये एका आंदोलनकर्त्याला मारहाण झाल्याने स्थानिक पुरोगामी संघटनांनी याचा निषेध केला असून, हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. तर, महायुतीच्या वतीने यावर प्रतिक्रिया देताना, हा प्रयत्न सवंग प्रसिद्धीसाठी आणि माजी मंत्र्यांच्या अजेंड्यासाठी असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणावर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी मतप्रवाह असून, राजकीय वातावरण तापले आहे.
छात्रभारी या विद्यार्थी संघटनेचा राज्यअध्यक्ष अनिकेत घुले यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलने केली. महाआघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारच्या काळात त्याने विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. आज देखील मंत्री निलेश राणे घटनेची शपथ घेऊनसुध्दा घटनाबाह्य वक्तव्य करतात त्यामुळे त्यांना सरकारने मंत्रिमंडळात ठेऊ नये अशी मागणी शासनाच्याच एका वरीष्ठ मंत्र्यांकडे घुले यांनी केली असता मंत्र्यांचे कार्यकर्ते थेट त्याला मारहाण करतात. तसेच मंत्री आणि कार्यकर्ते या मारहाणीचे जाहीर समर्थन करतात यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती बिघडली आहे हे स्पष्ट दिसते. पालकमंत्र्यांच्या व पोलीसांच्या समोर झालेली ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शनिवारी दुपारी विविध पुरोगामी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानेच मारहाण
“अनिकेत घुले यांच्यावर हल्ला: पुरोगामी संघटनांचा तीव्र निषेध”
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अनिकेत घुले हा पुरोगामी विचाराचा तरुण कार्यकर्ता, पालकमंत्री महोदयांना फक्त निवेदन द्यायला गेला होता. त्यावेळी त्याने त्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्याला ज्या पद्धतीने मारहाण केली ते संगमनेर तालुक्याच्या संस्कृतीला आणि चळवळीला शोभणारे नाही. टोळक्याकडून ही मारहाण सुरू असताना पालकमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घ्यावी हे त्याहून अधिक दुर्दैवाचे आहे असे मत संगमनेर तालुक्यातील पुरोगामी संघटनांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील पुरोगामी संघटनांनी निवेदन प्रसिद्ध करून अनिकेत घुले यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. संगमनेर तालुक्यात शेजारील संस्कृती राबविण्याचा अजेंडा काही मंडळींनी घेतलेला आहे. तस्कर असलेल्या या मंडळींकडून मारहाण करून धाक आणि दडपशाही निर्माण केली जात आहे. राजकारणात एखादी भूमिका आपल्याला मान्य नसेल मात्र तरीही लोकशाही मार्गाने ती ऐकून घ्यावी लागते. मात्र लोकशाहीच न मानणार्या मंत्री महोदय आणि त्यांच्या हस्तकांकडून जो घृणास्पद प्रकार संगमनेरमध्ये घडला तो संगमनेरच्या परंपरेला काळीमा फासणारा आहे.
मंत्री महोदयांनी शेजारच्या तालुक्यामध्ये आंदोलने दडपण्याची संस्कृती रुजवलेली आहे, त्यांच्या विरोधात बोलण्याचा कुणी प्रयत्न केला किंवा त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय मोडले जातात. हीच संस्कृती त्यांचे समर्थक संगमनेरमध्ये रुजवू इच्छितात. मात्र त्यांचे समर्थक, हे विसरून गेले आहे की हा चळवळीचा तालुका आहे. क्रांतिकारक आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी या तालुक्याची संस्कृती विकसित केलेली आहे. मारहाण करून ते कोणाचाही आवाज दाबू शकणार नाही याउलट संगमनेर तालुक्यात त्यांच्या विरोधात हजारो अनिकेत घुले तयार होतील. असा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला.
जनतेने दिलेला कौल सन्मानाने स्वीकारायचा असतो, मात्र संगमनेर तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उन्मादी झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, विद्यमान पालकमंत्री आणि त्यांचे समर्थक दादागिरी आणि मारहाणीचे समर्थन करत आहेत. झालेल्या घटनेचा निषेध करायचा सोडून पालकमंत्री अशा छोट्या मोठ्या घटना होत राहतात असे म्हणून या मारहाण करणार्या संस्कृतीला पाठबळ देत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी नवे आहेत, त्यांना कदाचित बोलण्याची आणि वागण्याची रीत माहीत नसेल. लोकशाही म्हणजे नेमकं काय याचा अर्थ कदाचित त्यांना माहीत नसेल, त्यांच्या समर्थकांनाही आंदोलनाचा अर्थ कळत नसेल मात्र अनुभवी असलेल्या मंत्रिमहोदयांना हे समजू नये हे वेदनादायी आहे.
संगमनेर तालुक्यात या अगोदर कधीही अशी संस्कृती रुजली नाही, शांततेने आणि प्रेमाने राहणारा हा तालुका आहे. विरोधकांना सुद्धा आपलेसे मानण्याची वृत्ती या तालुक्यात आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपते, असे समजणारी मंडळी संगमनेर तालुक्यात आहे. मात्र हीच संस्कृती मोडीत काढून टवाळखोरांची संस्कृती रुजविण्याचा पालकमंत्र्यांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. विचारांची लढाई विचारांनी लढाईची असते. हातपाय मोडून तुम्ही विचार संपवू शकत नाही, मारहाण करून तुम्ही एखाद्याचा आवाज दाबू शकत नाही, मात्र एका विजयाने चवताळलेल्या पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हा विजय देखील पचवता आलेला नाही.
अनिकेत घुले याच्यावर झालेला हल्ला हा काही टवाळखोरांच्या स्वयं प्रेरणेने झालेला नव्हता. पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने आणि विद्यमान आमदारांच्या संमतीनेच हा भ्याड हल्ला करण्यात आला. निवेदन देण्यासाठी आलेल्या चार कार्यकर्त्यांनीच पालकमंत्र्यांच्या दौर्यात धुडगूस घातला अशी धादांत खोटी माहिती त्यांच्या समर्थकांकडून पसरवली. मात्र त्या घटनाक्रमाचे सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांच्या मूक संमतीने अनिकेत घुले यांच्यावर हल्ला झाला तो समग्र राज्याने बघितलेला आहे. अनिकेत घुले हा स्वाभिमानी आणि वैचारिक जीवन जगणारा कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातही त्यांनी या अगोदर अनेक शैक्षणिक विषयांवर आंदोलन केलेली आहेत. तो चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका.
राजकारणात वादविवाद होत असतात, मात्र त्याचे रूपांतर कोणी मारहाणीत करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वाभिमानी संगमनेरकर ते सहन करणार नाही. हा लढाऊ बाण्याचा तालुका आहे हे कोणीही विसरून जाता कामा नये. यापुढे टवाळखोरांकडून असा टारगटपणा होत राहिला तर तो खपवून घेतला जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात धुडगुस
संगमनेरमध्ये आंदोलकांचा स्टंट; महायुतीकडून आंदोलकांचा निषेध
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारे काही जण संगमनेर शहरात कार्यरत आहे. अलिकडे या आंदोलनजीवींना जनता किंमत देत नाही म्हणून आता माजी मंत्र्यांचा अजेंडा विविध कार्यक्रमात राबवण्याची सुपारीही घेण्याचा धंदा सुरु केला असल्याची टीका महायुतीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौर्यात घुसून धूडगुस घालणार्या प्रवृत्तींचा महायुतीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.
या संदर्भात महायुतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मानभावीपणे माजी आमदार भेट द्यायला आले की, मुग गिळून गप्प बसायचे आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील आले की, निषेधाच्या घोषणा द्यायच्या असा दुटप्पीपणा प्रकार याच तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या शिपायाने केला होता. या शिपायाने आज पुन्हा ना. विखे यांच्या दोर्यात आंदोलनाचा घाट घालून स्वता:ला मिरवून घेण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने आलेल्या राज्याच्या मंत्र्यांच्याच अंगावर धाकदडपशाही करुन धावून जायचे. हा निंद्य प्रकार महायुतीचे कार्यकर्ते कदापीही सहन करणार नाहीत.
संगमनेर शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, इतर सुविधा यांच्या कामासाठी पालकमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरळीत पार पडली म्हणजे आपल्या नाकर्तेपणाचे पितळ उघडे पडणार हे लक्षात आलेल्या माजी आमदारांनी तथाकथीत आंदोलकाला सुपारी देवून पाठविले. या आंदोलकाला पद आणि प्रसंगाचे औचित्यही समजत नाही. कोणतेही इतर मंत्री दुसर्या मंत्र्याचा राजीनामा घेवू शकत नाही. तो अधिकार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे आहेत. हे उघड असताना सुद्धा त्याबाबतचे निवेदनाचे निमित्त करुन महायुतीच्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा जाणिवपूर्वक घातलेला गोंधळ आणि निवेदन देण्यासाठी केलेला स्टंट याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फक्त दूर करुन समज दिली.
मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष हे आंदोलनकर्ते करत आहेत. तातडीची प्रतिक्रीया देण्यासाठी त्यांना सुपारी देणारे आता त्यांचे नेते ज्या तर्हेने पुढे आले त्यातून पराभव अजूनही पचला नसल्याचे स्पष्ट होते. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह आ.अमोल खताळ पाटील अशा खोट्या आंदोलकांना आणि सुपारी देणार्यांना भित नाही आणि किंमतही देत नाही. असे या निवेदनात म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवून पराभवानंतर गळा काढणार्या माजी आमदारांना एवढीच आठवण करुन द्यावीशी वाटते की, ती म्हणजे संगमनेर जिल्हा होण्यासाठी एकाकी लढा देणार्या आत्माराम देशमुख यांच्यावर पोलिस स्टेशनसमोर महिलांनी हल्ला केला त्यावेळी या महिला कार्यकर्ते कोणाचे होते. त्यावेळी सूद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुग गिळून गप्प होते. निषेध सोडाच पण आत्माराम देशमुखांवरच गुन्हा दाखल करायला लावला तेव्हा दडपशाही दहशत कोणाची हे तालुका ओळखून आहे. त्यामुळे अशा घटनांचा आणि अशा सुपारी घेणार्या कार्यकर्त्यांचा महायुती निषेध करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.