वादग्रस्थ टोल नाका बंद करा, अन्यथा आंदोलन
टोल नाका फोडण्याचा संगमनेरकरांचा इशारा
संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)-
गाडीला धडक दिल्यामुळे नुकसान भरपाई मागण्याच्या कारणावरून शहरातील भाजप कार्यकर्ते व व्यापारी असलेल्या तिघा बंधूंना टोल कर्मचार्यांकडून बेदम मारहाण झाली. तीघांना थेट रुग्णालयात दाखल करावे लागले इतकी मारहाण करण्यात आल्याने संगमनेरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी (दि. 30) रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरातील टोल नाक्यावर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन प्रमुख आरोपीसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा टोल नाका सक्तीच्या वसुलीसाठी आणि गुंडागर्दीसाठी प्रसिद्ध असून अनेक वाहन चालकांना याठिकाणी मारहाण करण्यात आली आहे. संघटीत गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या या टोलनाक्यावर कारवाई करावी आणि येथील दहशत थांबवावी अशी मागणी वाहन चालक व संगमनेरातील नागरीकांनी केली आहे.
हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर वाढलेल्या दहशतीविरुद्ध व शहरातील व्यापार्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ या दोन आमदारांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी प्रांतकार्यालयावर छोटेखानी मोर्चा नेत हा वादग्रस्त टोलनाका बंद करावा. येथील गुंडगिरी करणार्या कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच या पुढे कोणतीही घटना घडल्यास हा टोल नाका फोडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. हिवरगाव पावसा येथील टोलनाका हा गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त आहे. नाशिक पुणे महामार्गावर असंख्य समस्या असताना, चुकीच्या व बोगस कामामुळे आजपर्यंत अनेकांचे बळी गेलेले असताना, अनेक जण जायबंदी झालेले असताना या ठिकाणी पठाणी पध्दतीने वसूली सुरू असते. स्थानिक नागरीकांना टोलमाफी असताना देखील त्यांच्याकडून सक्तीने तर कधी फासटॅग च्या माध्यमातून टोल वसूल केला जातो. येथील दादागिरी, दहशत तर विकोपाला गेली आहे. याठिकाणी गुंडांच्या टोळ्या ठेऊन किरकोळ कारणावरून वाहन चालकांना मारहाण केली जाते. रस्त्याच्या प्रश्नावरुन, दहशतीच्या प्रश्नावरून अनेक वेळा याठिकाणी आंदोलन, मोर्चा काढण्यात आला. कधी सत्ताधार्यांची तर कधी विरोधकांनी मोर्चा काढला परंतु निर्ढावलेले टोल प्रशासन, संबंधित अधिकारी यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. या टोल नाक्याच्या दहशतीला कोणाचा पाठींबा आहे असा प्रश्न उपस्थित करत आ. अमोल खताळ यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. यावेळी मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह गिरिष मालपाणी, प्रकाश कलंत्री, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्पे, सोमेश्वर दिवटे, प्रकाश राठी, आप्पा केसेकर, अॅड. दिलीप साळगट, योगेश जाजू , महेश डंग, दिलीप पारख, अल्पना तांबे, सौदामिनी कान्होरे, प्रमिला अभंग यांच्यासह शहरातील व्यापारी वाहन चालक व नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
दरम्यान शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व तरुण व्यापारी अतुल राधावल्लभ कासट हे आपले बंधू अमित कासट, अमरीश कासट व मित्र शैलेश वामन यांच्यासह जेवण करण्यासाठी बाहेर गावी गेले होते. जेवण करून काल सोमवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास सर्वजण संगमनेरकडे परत येत होते. तेव्हा हिवरगाव पावसा येथील टोल नाका लेनमध्ये गाडी घालत असताना अचानक (एम.एच. 15 ए 9003) क्रमांकाची एक लाल कार कासट यांच्या अल्टो कारच्या उजव्या दरवाज्यास धडकली. त्यानंतर आमच्या गाडीची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी कासट यांनी केली. त्यामुळे सदर गाडीतील तरुणांनी कासट यांना दमदाटी केली. बुलेटवर आलेल्या अमोल सरोदे, मंगेश फटांगरे, किरण रहाणे यांनी देखील कासट यांना दमदाटी सुरु केली. त्यातील एकाने अतुल कासट यांच्या डोक्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. तर तिघांपैकी एकाने दगड मारला. त्यातील फटांगरे याने अमित कासट यास दगड हातात धरुन व हातातील लोखंडी कड्याने अमीत यास मारले. लाल कारमधील आठ ते दहा जणांनी अतुल कासट यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. अतुल कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल सरोदे, मंगेश फटांगरे, किरण रहाणे व इतर 8 ते 10 जणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.