मुंबईच्या चोरट्यांचा 85 हजार रूपयांच्या शेळ्यांवर डल्ला

0
1692

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरटे गजाआड


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर वयोवृद्ध पशुपालकास झाडास बांधून 21 शेळ्या चोरून नेताना चौघांपैकी तिघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले. चौथा आरोपी कारसह पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना वेल्हाळे ता. संगमनेर येथे मंगळवारी दि. 23 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वामन देवजी दुधवडे (वय 65), रा. वेल्हाळे हे वयोवृद्ध मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी शेळ्या चारत होते. त्याच दरम्यान चौघेजण आले आणि दुधवडे यांना विचारले की, डोेंंगरावर जाण्यासाठी हाच रस्ता अहि का? त्यावेळी हाच रस्ता असल्याचे दुधवडे यांनी सांगितले. मात्र याच दरम्यान एका जणाने दुधवडे यांना पाठीमागून पकडले व दोघांनी हात धरले व चौथ्याने तोंडाला रुमाल बांधला तसेंच हातपाय बांधून निलगिरीच्या झाडाला बांधून चाकूचा धाक दाखवून शळ्या चोरून निघून गेले.


दरम्यान दुधवडे यांनी हाताची हालचाल करून होत सोडले आणि घरी पळत जाऊन घरच्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी सायखिंडी फाटा परिसरात पाठलाग करून तिघांना पकडले. तर चौथा आरोपी कार (क्र. एमएच 04 एलबी. 0742) घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या या तिघांनाही नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी पशुपालक वामन दुधवडे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून एराफ आलम अन्सारी (रा. शांतीनगर तलाव, भिवंडी बाह्यवळण मार्ग, भिवंडी), अन्सारी सानिफ मुक्तार (रा. कसाई वाडा, भिवंडी), मोहम्मद माजिद मो. अस्लम अन्सारी (रा. शांतीनगर, भिवंडी) व पळून गेलेला चालक जिशान (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अटक केलेल्या तिघांना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पांच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान, चोरून नेलेल्या 85 हजार रुपयांच्या शेळ्या पोलिसांनी दुधवडे यांना परत केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here