महिलेचे साडेपाच तोळे दागिने लांबवले
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहर पोलीस ठाणे हद्दीत एकामागून एक चोर्यांचे सत्र सुरूच असून आता पुन्हा एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने साडेपाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेहमीप्रमाणे पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वारंवार होणार्या या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शांता मारुती साबळे (वय 53, रा. जगदाळे चाळ, रुम नंबर चार, परदेशी अपार्टमेंट ठाणे) या संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पर्सची चेन उघडून पर्समधील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरून पळून गेला. याप्रकरणी शांता साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 414/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव करत आहेत. सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भाव वाढल्याने चोरांनी आपली वक्रदृष्टी सोन्याकडे वळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड संगमनेर शहरातील विविध भागांमध्ये गंठण चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पायी किंवा दुचाकीवरून जाणार्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येऊन ओरबाडून धूमस्टाईलने पोबारा करणे, बसमध्ये चढताना आल्हादपणे दागिने काढून घेणे त्यामुळे महिला अक्षरशः वैतागल्या आहेत. फक्त गुन्हे दाखल होतात परंतु तपास लागत नाही. पोलीस निरीक्षकांचा चोरांवर थोडासुद्धा वचक राहिला नसल्याने चोरट्यांना मोकळे रान झाले आहे. तपास लागत नसल्याने आणि वरून पुन्हा पोलिसांचा वैताग यामुळे अनेकजण गुन्हेही दाखल करत नाहीत. अद्यापही पोलिसांना एकाही चोरीचा शोध लावण्यात यश आले नाही.