खांडगाव येथील शेतकऱ्याचा अजब प्रकार
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका शेतकऱ्याने विकासाच्या नावाखाली शासकीय जमिनीतून मुरूम काढून तो पारंपारिक वहिवाटीच्या रस्त्यावर टाकून तेथे शेती तयार केली. परिणामी वहिवाटीचा रस्ता बंद होऊन तो बंधाऱ्याच्या सांडव्यातून जाण्यास तयार करण्यात आला. तसेच या शेतकऱ्याने बंधाऱ्याच्या भिंतीचा भराव काढून घेतल्यामुळे आज बंधाऱ्याच्या भिंतीच्या बाजूने पाणी पाझरत असून ते पाणी रस्त्यावर साचत आहे. परिणामी येथील भाग चिखलमय झालेला असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा त्रास होत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे आधीच अरूंद झालेल्या रस्त्यावर पाणी, चिखलामुळे ये जा करणे अवघड झाले असून नागरीकांनी याबाबत ग्रामपंचायतला निवेदन दिले होते. मात्र कार्यवाही झाली नाही तर आता थेट तहसीलदार यांना निवेदन देत कारवाई झाली नाही तर आंदोलन, उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
खांडगाव येथील शेतकरी नामदेव गणपत बालोडे या शेतकऱ्याने या ठिकाणी केलेले अतिक्रमणामुळे तलावाच्या सांडव्यारा देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच अरूंद झालेल्या रस्त्यामुळे शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बियाणे त्याचबरोबर जनावरांसाठी लागणारा चारा वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या बंधाऱ्याच्या सांड्यातून पाणी वाहत असून ते पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिक मोठी कसरत करून जात आहे. दरम्यान सदर काम होत असतानाच लेखी तक्रार ग्रामपंचायत खांडगाव यांना करण्यात आली होती. गावातील तंटामुक्तीच्या सदस्यांनी सदर व्यक्तीला स्वतःहून रस्ता काढून देण्यास सांगितले होते. त्यांनी काढून देतो असे मान्य केले होते परंतु अद्याप त्यावर त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही. तसेच ओढ्यापर्यंत रस्ता काढून दिलेला नाही. याबाबत तहसीलदारांना नागरिकांनी लेखी अर्ज केलेला असून सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली आहे