राजापूर क्रांतीकारकांचे त्याग, लढे सर्वांसाठीप्रेरणादायी व आदर्श – बाळासाहेब थोरात

0
24

युवावार्ता (प्रतिनिधी)
राजापूर – आपल्या देशाला स्वातंत्र करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांनी तुरूंगवास भोगला, बलिदान दिले. राजापूरचे क्रांतीकारक विडी कामगार चळवळी, स्वातंत्र्याच्या चळवळी व त्यानंतरही चळवळीत सक्रिय होते. त्यांचा त्याग व लढे आजही स्फुर्तीदायी असून राजापूरचे हुतात्मा स्मारक संघर्षाचे व त्यागाचे प्रतिक आहे. असे विचार राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. राजापूर हुतात्मा स्मारकाच्या 75 व्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ. सत्यजित तांबे, अ‍ॅड. कॉ. सुभाषराव लांडे, अ‍ॅड. कॉ. बन्शी सातपुते, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. कारभारी उगले, कॉ. अ‍ॅड. ज्ञानदेव सहाणे, कॉ. डॉ. राधेशाम गुंजाळ, बापूसाहेब हासे, प्रा. विठ्ठलराव शेवाळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

9 मार्च 1950 रोजी झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे वारसदार राजेंद्र गोलेकर, रामभाऊ कदम परिवारातील सदस्य यावेळी अगत्यपूर्वक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना हुतात्मा स्मारक समितीचे कार्याध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी सांगितले की, 100 वर्षांपूर्वीचे राजापूर विडी कामगारांचे, कष्टकर्‍यांचे, कोरडवाहू शेतकर्‍यांचे होते. कामगार चळवळीचे नेते कॉ. रामभाऊ नागरे, कॉ. विष्णुबुवा हासे, कॉ. भाऊसाहेब थोरात यांनी विडी कामगार, कष्टकरी, शेतकर्‍यांचे संघटन केले. चळवळी केल्या. अन्यायाविरूद्ध लढे दिले. तुरूंगवास भोगला आणि हुतात्मेही झाले. हा इतिहास, परंपरा, वारसा घेऊन आम्ही राजापूरकर वाटचाल करीत असतांना सर्व प्रकारची प्रगती केली आहे. पदव्युत्तर शिक्षणापासून, उद्योग, व्यवसाय व सार्वजनिक सुविधा असलेले राजापूर हुतात्म्यांच्या स्मारकास प्रेरणास्थान, क्रांतीचा दीपस्तंभ बनविणार आहे. राजापूरचे ग्रामस्थ, संस्था, तरूणाईने एकत्र येऊन 75 व्या स्मृतीदिनाचे अतिशय प्रयत्नपूर्वक व भव्य स्वरूपात आयोजन केले.

आमच्यातील मतभेद विसरून यानिमित्त आम्ही एक झालो असून हुतात्म्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी शैक्षणिक, व्यवसायिक प्रयत्नांद्वारे राजापूर राज्यातील आदर्श गाव बनविण्यासाठी सज्ज झालो अहोत. आपल्या मनोगतात श्री. थोरात पुढे म्हणाले की, क्रांतीकारकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य व संविधानाने प्रत्येकास दिलेले स्वातंत्र्य आज अडचणीत आले आहे. चुकीचा धर्म तरूणांना सांगीतला जात आहे. छत्रपपतींच्या कर्मवादा ऐवजी धर्मवाद सांगून जाती-जातीत, धर्मा-धर्मात द्वेष पसरविला जात असतांना राजापूरचे हुतात्मा स्मारक क्रांतीकारकांचा त्याग व लढे आपल्याला वास्तवाचे भान करून देत आहेत. आजच्या ग्रामस्थांनी, विद्वानांनी तरूणपिढीस धर्मद्वेषापासून वाचविण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम सुरू केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे परिवर्तन घडेल. हुतात्मा स्मारकास अभिवादन व लाल झेंड्यास सलामी देतांना वातावरण भारावून गेले होते. जुन्या आठवणींना उजाळा देतांना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. संयोजकांनी स्मारकाची सजावट, रांगोळीसह अतिशय सुंदर केली होती. “घे सलामी तुला आज उघड्यावरी, लाल झेंड्या सलामी घे उघड्यावरी“ या झेंडा गीताने उपस्थितांनी झेंड्यास लाल सलाम केला.

9 मार्च 1950 च्या घटनाप्रसंगी उपस्थित असलेले कॉ. भागाजी बबूजी हासे, कॉ. दशरथ कारभारी हासे. कॉ. श्रीरंग संतू हासे, कॉ. सुखदेव भाऊ हासे यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानीत करून हुतात्म्यांच्या वारसांना व राजापूर क्रांतीकारकांच्या वारसांना उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, क्रांतीलढ्याचे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. आ. सत्यजीत तांबे, कॉ. स्मिता पानसरे, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, यांनी शेतकर्‍यांचे प्रश्‍न, तरूणाईचे प्रश्‍न, , संघाची समाजस्थिती याविषयी विचार प्रगट केले. शेतकर्‍यांच्या जमीनीची लूट व शेतमालाचे बाजार, देशात बोकाळलेली मोफत देण्याची रेवडी संस्कृती याविषयी वास्तवाचे प्रगटन केले. कॉ. सहाणे मास्तर सेवाभावी संस्थेद्वारे 50 हजार रूपयांचा निधी प्रागतिक शिक्षण संस्थेस विद्यार्थ्यांच्या बक्षिसांसाठी संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. अनिल गोडसे. आर. पी. हासे, प्राचार्य डॉ. सुभाषराव कडलग यांनी संस्थेचे विश्‍वस्त अ‍ॅड. ज्ञानदेव सहाणे व प्रतापराव सहाणे यांच्याकडून स्विकारला. राजापूर हुतात्मा स्मारकाचा 75 वा स्मृतिदिन भव्य स्वरूपात यशस्वी करण्यासाठी स. म. भा. थो. सह. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, माधव रामभाऊ हासे, हुतात्मा स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष कॉ. द. का. हासे, कार्याध्यक्ष कॉ. किसन भाऊ हासे, सचिव सुखदेव मोहिते, प्रा. आनंद हासे, प्रभाकर देशमुख गुरुजी, अ‍ॅड. भारत आनंदा हासे, रमेश लांडगे, देवराम भिमाजी हासे, संजय नागरे, बाळासाहेब सोनवणे, जिजाबा हासे, बाळासाहेब भिकाजी हासे, राजेंद्र विठ्ठल हासे, अजय विजय हासे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मोहिते व जिजाबा हासे यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रा. अशोक जाधव यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली. राजापूर ग्रामपंचायत सरपंच कुसुमताई पानसरे व त्यांचे सर्व सहकारी, राजापूर सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब खतोडे व त्यांचे सर्व सहकारी, धनलक्ष्मी पतसंस्था, लोकविकास पतसंस्था, स्वतंत्र सैनिक देशमुख पतसंस्था, इंदिरा महिला पतसंस्था, जनकल्याण पतसंस्था, म्हाळुंगेश्‍वर दूध संस्था, सहकार महर्षी थोरात दूध संस्था, हुतात्मा हॉलीबॉल क्लब राजापूर, उद्योजक, ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरीव सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here