जिला न्याय द्यायचा, तिच्यावरच गुन्हा

मला अटक करा पण भावांवरील खोटे गुन्हे मागे घ्या

शेकडो महिलांसह डॉ. जयश्रींचे पोलिसांना निवेदन

पोलिस दबावाचे बळी, त्यामुळे ठिय्या आंदोलन – थोरात

प्रमुख कार्यकर्त्यांवर थेट हाफ मर्डरचे गुन्हे,

निवडणुक काळात प्रमुख कार्यकर्ते तुरूंगात ठेवण्याचा खेळ

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर- युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यावर भाजपच्या व्यासपीठावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात टीकाटिप्पणी केल्यानंतर संगमनेरमध्ये मोठा उद्रेक झाला. या उद्रेकाला आधार धरून संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. यातच कहर म्हणजे ज्यांच्याबद्दल अनुद्गार काढण्यात आले त्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर देखील जमावबंदीचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर आक्रमक झालेल्या जयश्री थोरात यांनी सांगितले की माझ्यामुळे हे संपूर्ण महाभारत सुरू झाले आहे. माझ्यावर अन्याय झाला असला तरी मला जेरबंद करा परंतू माझ्या भावांवर आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सुड भावनेने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. या मागणीसाठी आज रविवारी पुन्हा एकदा शेकडो महिलांच्या उपस्थित शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन निवेदन दिले.

डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल भाजपच्या व्यासपीठावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आलेली असताना वसंत देशमुख या विकृत इसमावर तात्काळ गुन्हा दाखल न करता रात्रभर डॉ. जयश्री थोरात आणि परिवार तसेच समर्थकांना बसवून ठेवण्यात आले. अखेर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतू अद्यापपर्यंत वसंत देशमुख यांना अटक करण्यात आली नाही. मात्र शनिवारी रात्री पोलिस ठाण्यावर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी डॉ. जयश्री थोरात यांच्यासह खा. भाऊसाहेब वाकचौरे, दुर्गाताई तांबे, डॉ. सुधीर तांबे, उत्कर्षा रूपवते, इंद्रजित थोरात, शरयू थोरात, सुरेश थोरात, प्रभावती घोगरे, करण ससाणे, बाबा ओहोळ यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यानच्या काळात धादरफळ येथील घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांना काही ठिकाणी झालेली मारहाण, गाड्यांची झालेली जाळपोळ व तोडफोड याप्रकरणी तालुका पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, लाठ्या काठ्या, कुर्‍हाडी याद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली इंद्रजित थोरात, भास्कर खेमनर, सुभाष सांगळे, शाबिर तांबोळी, सिध्दार्थ थोरात, गोरक्ष घुगे, वैष्णव मुर्तडक, निखील पापडेजा, शेखर सोसे, शरद पावबाके, हर्षल रहाणे, निखील कातोरे, गौरव डोंगरे, अजय फटांगरे, शुभम घुले यांच्यासह 20-25 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरोधी उमेदवार जाहीर होण्याआधीच संगमनेरच्या निवडणुकीला हिंसक वळण लागून काही नेत्यांनी, पुढार्‍यांनी खालची पातळी गाठून संगमनेरचे राजकारण अतिशय गलिच्छ व खालच्या पातळीवर नेले आहे. राजकारणात टिका टिपणी याबाबत कोणाला आक्षेप नसतो. परंतू भरसभेत हजारो लोकांसमोर एखाद्या नेत्यावर, महिलांवर खालच्या पातळीवर जावून टीका करण्याची नवी पध्दत या निमित्ताने रूढ होत आहे. सदर घटना घडल्यानंतर मुख्य नेत्यांनी जाहिर माफी मागून व संबंधीत इसमावर तात्काळ गुन्हा दाखल करून हे प्रकरण शांत करता आले असते. परंतू आमची सत्ता, आम्हीही कमी नाही हे दाखविण्याच्या नादात हा वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. ऐन दिवाळीत राजकीय शिमगा सुरू असून पेटलेल्या या होळीत आता अनेकांची अब्रु, पत-प्रतिष्ठा जळत आहे.

संगमनेरात सुरू असलेले हे दहशतीचे, गुंडगिरीचे आणि प्रचंड द्वेषाचे राजकारण संगमनेरकरांना कधीही अपेक्षित नव्हते. विरोधाला विरोध यापर्यंत मर्यादित निवडणुका होत असताना आता थेट शिव्या शाप, मारहाण, जाळपोळ अशा घटनांपर्यंत मजळ गेली आहे.

राजकीय दबाव वापरून पोलिसांना तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेसने जरी केला असला तरी पोलिसांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास लावलेला प्रचंड वेळ ही त्यांची साक्ष देते. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संगमनेरकरांच्या संतापात भर पडली. वेळीच याची गंभीर दखल घेतली असती तर रात्रभर महिलांना घरदार सोडून पोलिस ठाण्यासमोर बसावे लागले नसते. हे कमी की काय म्हणून पुन्हा त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केला अशी उलटी बोंब मारत गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल आज जयश्री थोरात यांनी तीव्र शब्दात याचा निषेध करत मला तुरूंगात टाका परंतू माझ्या भावांवर ऐन सणासुदीच्या काळात दाखल करण्यात आलेले गंभीर गुन्हे मागे घ्यावे. हा अन्याय अत्याचार यापुढे संगमनेरकर सहन करणार नाही. केवळ मतातूनच नव्हे तर आगामी काळात या विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय संगमनेरकर शांत बसणार नाही असा इशाराही जयश्री थोरात यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख