चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना चिंताजनक !

0
72

संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)- संगमनेरसह अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिक भयभीत झाले आहेत. पहाटे फिरायला जाणार्‍या महिलांना लक्ष्य केले जात असून, गर्दीच्या ठिकाणीही चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिस तपासात दिरंगाई होत असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. तर सोन्याच्या किमती आकाशाला भिडल्या असल्याने चोर मालामाल तर चोरीला बळी पडलेले नागरिक कंगाल होत आहे. आज सोमवारी शहरातील एका उपनगरात अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडून घेत धूम ठोकली मात्र सदर महिला देखील हुशार असल्याने चोरट्यांच्या हाती नकली गंठण लागले.
पहाटेच्या वेळेत महिलांना लक्ष्य
पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणार्‍या महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. मोटारसायकलवर आलेले दोन चोरटे काही सेकंदांत सोन्याची साखळी तोडून पसार होतात. अनेक प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिस गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. अशीच एक घटना सीसीटिव्हीमध्ये आज कैद झाली. शहरातील महाराणा प्रताप चौक ते पाव बाकी रस्त्यावर सकाळी परिसरातील अनेक महिला नागरिक फिरण्यासाठी जात असतात. अनेक महिला या एकट्या देखील फिरताना दिसतात. आज सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास परिसरातील एक महिला गायींना चारा देण्यासाठी जात असताना दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या तरुणापैकी पाठिमागे बसलेल्या तरुणाने या महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबाडून धूम ठोकली. परंतु सदर गंठण हे बेंटेक्सचे असल्याने चोरट्यांचा डाव फसला. परंतु जर हे गंठण खरे असतेतर मोठा फटाका त्या महिलेला बसला असता.
बसस्थानकांवरही महिलांचे दागिने लंपास
फक्त रस्त्यांवरच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणीही चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी असते, अशा ठिकाणी चोरटे दबा धरून बसतात आणि संधी साधून दागिने चोरतात. या घटना दिवसाढवळ्या घडत असूनही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

सोन्याच्या भाववाढीमुळे चोरट्यांचा सुळसुळाट
सोन्याच्या किमती गगनाला भिडत असल्याने चोरट्यांचा गोरखधंदा तेजीत आहे. गुन्हेगारांसाठी हे जलद पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. पोलिसांनी पकडलेल्या काही आरोपींमध्ये प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणांचाही समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वारंवार गुन्हे करणार्‍यांवर मकोका लावण्याची गरज
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्ती पुन्हा पुन्हा चोरीच्या घटनांमध्ये अडकताना दिसत आहेत. अशा गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (चउजउ-) लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही काही स्थानिक संघटनांनी दिला आहे. गुन्हेगार पकडले जात नसल्याने अनेक नागरिक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. ‘तपासच होत नसेल, तर तक्रार करून काय उपयोग?’ अशी भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी अधिक सक्रिय होत चोरांच्या टोळ्या उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, अशी मागणी केली जात आहे.
एकीकडे बिबटे, दुसरीकडे चोर मोकाट!
संगमनेर आणि आसपासच्या भागात वन्यप्राण्यांचेही संकट वाढले आहे. बिबटे ग्रामीण भागात शिरत असताना, शहरी भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here