प्रभावतींचा प्रभाव पडला फिका
शिर्डी (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्ह्यातील लक्षवेधी लढत ठरलेल्या शिर्डी विधानसभा निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय संपादन केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी तब्बल 70282 मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राहाता, शिर्डीमध्ये आपलाच बोलबाला हे सिध्द करत त्यांनी बाळासाहेब थोरात व उमेदवार प्रभावती घोगरे यांना पराभवाची धूळ चारली आहे. नगर जिल्ह्यात विखे-थोरात यांचे राजकीय वैर सर्वश्रृत आहे. एकमेकांचा पराभव करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आपला मतदारसंघ सोडून विरोधकांच्या मतदार संघात जास्त लक्ष दिले. शिर्डीमध्ये महाआघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे असल्या तरी त्यांची संपूर्ण यंत्रण बाळासाहेब थोरात पहात होते. घोगरे यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रचारसभा या मतदार संघात घेतल्या. त्याचबरोबर प्रियंका गांधी यांचीदेखील मोठी सभा घेतली. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामावर विश्वास दाखवत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राधाकृष्ण विखे पाटील, महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे आणि अपक्ष डॉ. राजेंद्र पिपाडा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता होती परंतू पिपाडा आपला कोणताही प्रभाव पाडू शकले नाही. तर प्रभावती घोगरे यांचा देखील प्रभाव या ठिकाणी पडला नाही. विखे पाटील यांची प्रभावी यंत्रणा, मंत्रीपदाच्या माध्यमातून केलेली विकास कामे, लाडकी बहिण, लाडके भाऊ त्याचबरोबर शेतकरी वीज बील माफ अशा लोककल्याणकारी योजनांचे आश्वासन यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय सुकर झाला आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचाराची संंपूर्ण यंत्रणा यशस्वीरीत्या राबविल्याचाही फायदा याठिकाणी स्पष्ट दिसून आला. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांनी राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या गैरहजेरीत डॉ. सुजय विखे, शालिनीताई विखे, धनश्री विखे व प्रवरेची यंत्रणेने प्रभावी काम केले. विखे यांच्या प्रचंड विजयाने बाळासाहेब थोरात यांना धक्का बसला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात पुन्हा एकदा जिल्ह्यातून प्रभावी मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील दिसणार आहेत.