व्हायरल पत्रामुळे वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय हा अंतिम नसून तो फक्त प्रस्ताव आहे. नागरिकांना भेटून, त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. पण याबाबत विरोधक फक्त राजकारण करत असून मोठ्या प्रमाणात माझ्यावर टीका देखील करत आहे. परंतु, जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. सदर पत्र व्हायरल करून वातावरण खराब करणार्या कर्मचार्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना दिल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, अप्पर तहसील कार्यालय निर्माण करणे ही यापूर्वीचीच नागरिकांची मागणी होती. यामुळे फक्त प्रस्ताव मागितले होते. तो अंतिम नसून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहे. वास्तविक पाहता संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. यामुळे शासनानेच हे धोरण आहे की तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी प्रशासकीय सोयीच्या अनुषंगाने अप्पर तहसीलचा निर्णय 2022 मध्ये झाला आहे. याबाबत अहिल्यानगर येथेही अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले आहे. नाशिक विभागांतर्गत चौदा ठिकाणी हे प्रस्ताव मागितले गेले होते. संगमनेरमध्ये सोशल मीडियात जे व्हायरल झाले त्याचा वास्तविकतेशी किती संबंध आहे? याबाबत अधिकार्यांशी बोललो असता हा फक्त एक प्रस्ताव मागितला गेला होता आणि हा देताना या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रस्ताव झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून अधिकार्यांनी माझ्याशी देखील संपर्क केला होता. पण मी बाहेर असल्यामुळे आमची चर्चा झाली नव्हती. संगमनेरच्या जनतेने मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले आहे. यामुळे अप्पर तहसीलबाबत जो काय अंतिम निर्णय होईल त्यामध्ये आपल्या गावागावांतील प्रस्तावमध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटींचे निराकरण झाल्याशिवाय आणि गावकर्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय तो निर्णय अंतिम होणार नाही. मात्र, काहीजण जाणूनबुजून वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.