![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/04/RASTA-KHADDE.jpg)
गुंजाळवाडी ग्रामपंचायतीने त्वरीत खड्डे बुजवावेत – त्रस्त नागरीकांची मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरालगत असणार्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मेडीकव्हर हॉस्पिटल ते नाशिक -पुणे महामार्ग पुल या रस्त्यांची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे. अत्यंत वर्दळीचा व अनेक उद्योग व्यवसाय या रस्त्यालगत उभे असल्याने येथून ये-जा करणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे गुंजाळवाडी ग्रामपंचायतने या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्वरीत खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी या परिसरातील त्रस्त नागरीकांनी केली आहे.
संगमनेर शहराचा प्रचंड विस्तार झाला आहे. शहरात आता उद्योग व्यवसाायाबरोबरच वास्तव्यासाठी पुरेशी जागा नसल्याने शहरालगत असलेल्या गुंजाळवाडी, घुलेवाडी, कसारवाडी, सुकेवाडी, संगमनेर खुर्द, समनापूर या परिसरात आपले उद्योग व्यवसाय उभारले आहे. तसेच या गावांच्या हद्दीत आज मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. दरम्यान अगदी शहरालगत असलेल्या परंतू गुंजाळवाडी हद्दीत असलेल्या मेडिकव्हर हॉस्पिटल ते महामार्ग पुल हा रस्ता खड्ड्यांमुळे प्रचंड धाकोदायक बनला आहे. रस्त्यांमध्ये मोठ-मोठे खड्डे पडले असून साईड पटट्टया, कपारी, उघड्या पडल्या आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यातील खड्डे चुकवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे खड्डे चुकवतांना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर वहानांचेही प्रचंड नुकसान होत आहे. या रस्त्यावर मेडिकव्हर हे भव्य हॉस्पिटल, गंगासृष्टी हा भव्य गृहनिर्माण प्रकल्प, हॉटेल ग्रेप्स, हॉटेल रानवारा या सारखे व्यवसाय व वसाहती आहेत. राजापूर-गुंजाळवाडी नागरीकांना देखील संमनेरसाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावरून शहरातील व परिसरातील अनेक नागरीक सकाळ, सायंकाळ फिरण्यासाठी जात असतात. तसेच शिकाऊ वहान चालक देखील या रस्त्यावर सराव करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनचालकांची, पादचार्यांची वर्दळ असते. अशातच हा रस्ता प्रचंड खराब झाल्याने नागरीकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खडी उघडी पडली असून खड्डे आणि धुळ यामुळे वाहन चालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायतने व संबंधीत प्रशासनाने या रस्त्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची डागडुजी करावी व वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्रस्त नागरीकांनी केली आहे.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/04/RAJPAL-4-1024x1000.jpg)