शेतात पलटी झालेली कार दिली पेटवून
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव शिवारात उड्डाणपुलाच्या जवळ भरधाव वेगाने येणार्या इरटिका कारने पुढे चाललेल्या इलेक्ट्रिक स्कुटीला पाठीमागून जोराची धडक दिली. प्रचंड वेगात असलेल्या कारने या धडकेनंतर दोन तीन पलट्या मारत महामार्ग सोडून शंभर ते दिडशे फुट एका उसाच्या शेतात घुसली. तर इलेक्ट्रिक स्कुटीवरील 2 जण जखमी झाले. अपघातानंतर जमावाची आपल्याला मारहाण होईल या भीतीने कारचालक कार सोडून पळून गेला. ही घटना रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. तर सोमवारी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक ही कार पेटली. मात्र कार पेटली की, पेटवली याबाबत शंका निर्माण होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव शिवारातील उड्डाण पुलाच्या जवळ पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी इरटिका कार क्र. एम. एच. 14 एफ एक्स 2736 हिच्या वरील चालकाने समोर अक्षय लक्ष्मण पवार रा. रायतेवाडी आणि धीरज गुंजाळ रा. खांडगाव हे चालवत असलेल्या इलेक्ट्रीक स्कुटी क्र. एम. एच. 17 सीवाय 2112 हीस पाठीमागुन जोराची धडक दिली. या स्कुटीवरील अक्षय पवार आणि धीरज गुंजाळ हे दोघेही जखमी केले. त्यानंतर त्या कारने तीन ते चार पलट्या घेऊन थेट उसाच्या शेतात जाऊन कोसळली. या अपघातामुळे आपल्याला मार मारहाण होईल या भीतीने कारचा चालक संकेत सुनील ढोले रा. घोडेकर मळा हा कार सोडून पळून गेला. याबाबत स्कुटी चालक अक्षय लक्ष्मण पवार यांनी संगमनेर शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी कारचालक संकेत ढोले यांच्या विरोधात नवीन कायद्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सोमवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पलटी झालेली अपघातग्रस्त कार पेटत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली. शहर पोलीस उपनिरीक्षक विश्वास भानसी यांनी आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यावर पाण्याचा मारा करून ती आग विझवली. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली.