आवर्तन बंद करून घेतला शोध, ठाण्यातील बचाव पथकाला यश
युवावर्ता (प्रतिनिधी)
अकोले- अकोले तालुक्यात अतिशय धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. बुधवारी दुपारी सुगांव बुद्रुंक शिवारातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी धुळे येथून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून त्यातील पाच जवांनासह एक स्थानिक असे सहाजण पाण्यात पडले. पाण्याच्या दाबाचा व खोलीचा अंदाज न आल्याने व भोवर्यात अडकल्याने यातील तिन जवानांचा मृत्यू झाला होता. तर दोघांना वाचविण्यात दुसर्या पथकाला यश आले होते. मात्र एक जण बेपत्ता झाला होता. बुधवारच्या घटनेतील एक व गुरुवारच्या घटनेतील एक असे दोघा बेपत्तांचा शोध घेण्याचे काम काल गुरूवारी युद्धपातळीवर करण्यात आले. मात्र पाण्याचा वेग व धोकादायक ठिकाण तसेच संध्याकाळ झाल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली. तसेच ठाणे येथून सचिन डुबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन देखील थांबविण्यात आले.
दरम्यान आज शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली. बेपत्ता असलेले अर्जुन जेडगुले तसेच गणेश देशमुख हे दोघेही जिवंत असण्याची शक्यता जवळपास मावळली होती. त्यानूसार आज सकाळी ७.३० वाजता गणेश देशमुख व अर्ध्या तासाने अर्जुन जेडगुले याचा मृतदेह या पथकाने शोधून पाण्याबाहेर काढले.
दरम्यान एसडीआरएफ मयत जवान पोलीस उपनिरिक्षक प्रकाश नाना शिंदे, कॉ. राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ या तीन जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाच्या वतीने या जवानांना अभिवादन केले.
दरम्यान अकोले तालुक्यातील सुगाव येथे दोन तरुण मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते. सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हे प्रवरा पात्रातील पाझर तलावाजवळ अंघोळीसाठी गेले असता हा भयानक प्रकार घडला. आणि त्यातील अर्जुनला शोधण्यासाठी आलेल्या एसडीआरएफच्या तीन जवानांना तसेच त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक असलेल्या गणेश देशमुख याला देखील आपला जीव गमवावा लागला. तसेच या दुर्घटनेत कॉ. पंकज पंढरीनाथ पवार , कॉ. अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर भांडकोळी रूग्णालयात उपचार सुरू आहे.