व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

0
2869

जोपर्यंत व्यापारी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कांद्याचा लिलाव होऊ देणार नाही – शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा

युवावार्ता (प्रतिनिधी)
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भाव दिला जात असताना संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान उपबाजार समितीच्या आवारात मात्र कांद्याचे भाव व्यापार्‍यांनी अचानक कमी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक र्‍यांनी उप बाजार समितीच्या आवारातच कांदा लिलाव बंद पाडले. जोपर्यंत व्यापारी 2 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कांद्याचा लिलाव होऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला होता.
दरम्यान संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये काल बुधवारी दुपारी एक एक करत जवळपास दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर मधून शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र व्यापार्‍यांनी अचानक एक हजाराने भाव कमी काढला त्या्मुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संतप्त झाले. दोन हजार रुपयाचा भाव प्रतिक्विंटल दिल्याशिवाय आम्ही लिलाव सुरू होऊ देणारच नाही असा आक्रमक पवित्रा कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी घेत कांदा लिलाव बंद पाडला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगावपान उपबाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव बंद पाडल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांना समजताच ते या बाजार समिती दाखल झाले. संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजाराचा भाव असताना तुम्ही एक हजार भाव कसा कमी केला याचा जाब शेतकर्‍यांनी सचिव गुंजाळ यांना विचारला. त्यानंतर गुंजाळ यांनी सांगितल्यावर कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा संताप लक्षात घेत कांदा व्यापारी सतीश भंडारी, शौकत बागवान, मनसुख भंडारी आणि भारत मुंगसे यांनी पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू केले. एक हजार पासून साडेपंधराशे रुपये प्रतिक्विंटल असे कांद्याचे भाव काढले परंतु तेही शेतकर्‍यांना मान्य नाही. जो पर्यंत दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव काढत नाही तो पर्यंत आम्ही कांदा लिलाव सुरू होऊ देणार नाही असाही आक्रमक पवित्रा कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला त्यामुळे बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी सर्व व्यापार्‍यांना शेतकर्‍यांच्या समोर बोलावून घेत योग्य भाव काढा अशा सूचना दिल्या त्यानंतर कांदा लिलाव होण्यास रात्र होईल त्यामुळे उद्या कांदा लिलाव घेऊन असे व्यापार्‍यांनी सांगितले. त्यावर शेतकर्‍यांनी उद्या पुन्हा काय भाव निघेल आणि काय नाही याची शाश्वती नाही त्यामुळे आजच लिलाव करून घ्या असा आक्रमक पवित्रा घेतला. मात्र व्यापार्‍यांनी लिलाव करण्यास उशीर होत असल्यामुळे लिलाव करण्यास नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here