खजिनदारपदी पूजा मर्दा, पदग्रहण समारंभ उत्साहात
जिल्हा परिषद तास्करवाडी शाळेला बेंच सुपूर्त
युवावार्ता संगमनेर (प्रतिनिधी) – लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचा १९ वा पदग्रहण समारंभ मंगळवार दि. १८ जुलै रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे पार पडला. “We Serve” हे ब्रीदवाक्य मनाशी बांधून सामाजिक कार्य करणाऱ्या संगमनेर सफायर या नावजलेल्या क्लबच्या अध्यक्षपदी स्वाती मालपाणी, सचिवपदी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील तर खजिनदारपदी पूजा मर्दा यांची निवड करण्यात आली. पदग्रहण समारंभासाठी पदग्रहण अधिकारी म्हणून पुणे येथील माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एमजेएफ ला. विजय भंडारी, प्रमुख अतिथी म्हणून माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन ला. गिरीष मालपाणी, दीक्षा प्रदान अधिकारी ला. धनंजय धुमाळ, ला. आशिष बोरावके, ला. सीए. प्रशांत रूणवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभासाठी श्रीरामपूर,कोपरगाव, शिर्डी साई, राहाता,सिन्नर, संगमनेर लायन्स क्लब तसेच रोटरी क्लब संगमनेरचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शपथ पत्राचे वाचन करून नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. माजी अध्यक्ष ला. अतुल अभंग यांनी सन २०२३-२४ साली झालेल्या सर्व उपक्रमांचा आढावा यावेळी उपस्थितांना दिला. या कार्यकाळात एकूण ३४ सामाजिक उपक्रम अतुल अभंग यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, सर्व माजी अध्यक्ष तसेच सदस्यांचे संपूर्ण वर्षभर मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे अतुल अभंग यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. प्रवर्तन अधिकारी ला. धनंजय धुमाळ यांनी संगमनेर सफायरमध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या २० नूतन सदस्यांना यावेळी शपथ दिली. प्रमुख अतिथी ला. आशिष बोरावके व ला. प्रशांत रूणवाल यांनी आपल्या भाषणात मागील वर्षी झालेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. संगमनेर सफायर हा मोठा क्लब असून गिरीष मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक चांगली कामे केल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी आपण सफायर बिझनेस नेटवर्क (एसबीएन) या बिझनेस ग्रुपची स्थापना करणार असून सफायर सदस्यांनी उद्योग क्षेत्रात प्रगती करण्याचा उद्देश यामागे असल्याचे ला. गिरीश मालपाणी यांनी सांगितले.
ला. विजय भंडारी यांनी लायन्स सफायरच्या कामाचे कौतुक केले. सफायर बिजनेस एक्स्पो, एक हात मदतीचा, वृक्षारोपण, रक्तदान, सफायर मॅरेथॉन हे उपक्रम समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन अध्यक्षांचा परिचय ला. राजेश मालपाणी यांनी करून दिला. माझ्या कार्यकाळात वृक्षारोपन, प्रवरा नदी स्वच्छता अभियान यासारख्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचे नूतन अध्यक्ष स्वाती मालपाणी यांनी सांगितले. येणाऱ्या कार्यकाळात सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपण काही नवीन उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी क्लबमध्ये चांगले काम करणाऱ्या सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार सचिव प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी मांडले.
जिल्हा परिषद तास्करवाडी शाळेला बेंच सुपूर्त
ला. श्रीनिवास भंडारी आणि अध्यक्ष स्वाती मालपाणी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा तास्करवाडी यांना 15 बेंच सुपूर्त करण्यात आले. पटसंख्या 30 असलेली ही शाळा अतिशय दुर्गम भागात असून आजही या शाळेत बसण्यासाठी बेंचची व्यवस्था नाही. ही गरज ओळखून क्लबच्या वतीने ही मदत केल्याचे ला. श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अविस्मरणीय आनंद होता.