अशोक भुतडा यांच्या स्मृती जीवंत ठेवण्यासाठी अमरधाम मध्ये त्यांच्या नावाने प्रेक्षागृह आहे
आज अशोक भुतडा यांचा जन्मदिवस पण तो साजरा करायला अशोक आज आपल्यात हयात नाहीत. कोरोना साथ काळात अशोकचा मृत्यू झाला, शेकडो लोकांचा अंत्यसंस्कार करणाऱ्या अशोकच्या अंत्यसंस्कार समयी कोरोना निर्बंधांमुळे हजर राहता आले नाही याची बोच कायम आहे.
अशोक भुतडा म्हणजे संगमनेर मधील कोणत्याही माणसांच्या वेळेकाळाला धावून जाणारा माणूस,कोणाच्याही घरात एखादी दुःखद घटना घडली , कोणी इहलोक सॊडून गेले की, त्यांच्या मदतीला अशोकराव धावून जाणार, अंत्यविधीचे सर्व क्रियाकर्म स्वतः पुढाकार घेऊन पार पाडणार.तेच अंत्यविधीच्या सामानाची लाईन लावणार,कलेवराची आंघोळ,तिरडी,अम्बुलन्स ची व्यवस्था करणार,अमरधाम मध्ये सरपण पोहोच होण्याची खबरदारी घेणार, मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना निरोप देणार, तेच तिरडी बांधणार,आणि खांदेकरी निवडणार आणि त्यांना मार्गदर्शन करणार, कलेवर अमरधाम मध्ये आल्यावर मृत व्यक्तीच्या ज्या समाज गटाची असेल त्यांच्या रूढी परंपरानुसार अंत्यविधी पार पाडणार, अमरधाममध्ये सरण रचणे,अग्निडाग देणे,मडके फिरवणे,मडके फिरवतांना अष्मने त्याला तीन छिद्र पाडणे, सावडन्याबाबत सूचना देणे.सामुहिक प्रार्थना व श्रध्दांजली वाहने हि सर्व कामे अशोकराव भुतडा भक्तिभावाने, न डगमगता, कोणताही आळस,कंटाळा न करता चाळीस वर्षे करीत होते. त्यांच्या हातून आत्तापर्यंत काही हजार अंत्यसंस्कार पार पडले आहेत. त्यांच्या या कामाची संगमनेर शहराच्या इतिहासात कायम नोंद राहील. अशोक भुतडा यांच्या स्मृती जीवंत ठेवण्यासाठी अमरधाम मध्ये त्यांच्या नावाने प्रेक्षागृह आहे.
अशोकराव म्हणजे संगमनेरचे भुषण ,त्यांच्यावर संगमनेर करांनी नीरतीशय प्रेम केले.त्यामुळेच संगमनेर मर्चंट बँकेत ते अनेकवेळा संचालक म्हणून निवडून आले.संगमनेर नगर पालिकेत ते नगरसेवक म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आले.त्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील राजकीय महाशक्ती सक्रीय होत्या तरीही सर्व सामान्य माणसांनी अशोक भुतडा यांना निवडून आणले.
अशोकराव सर्वोदय व्यापारी संघ, बाळासाहेब थोरात मित्र मंडळ, लालाजी चौक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून विविध समाजसेवी उपक्रमात सक्रिय होते. माहेश्वरी समाजात अशोकराव यांची प्रेरणा घेऊन अंत्यसंस्कार करणारी खूप मोठी तरुणांची टीम तयार झाली आहे. अशोकराव रिमांड होमचे चार दशके सन्माननीय सदस्य होते. रिमांडहोमने 1997 साली राज्यव्यापी वंचित बालक क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. राज्यभरातून शेकडो वंचित बालक संगमनेरात आले होते,या कार्यक्रमाचे भोजन प्रमुख अशोकराव होते, त्यांनी तीन दिवस हि व्यवस्था खूप छान केली आणि संगमनेरचे वैभवात भर घातली. अशोकराव भुतडा माझे घनिष्ठ मित्र होते, त्यांच्या बाजारपेठेतील दुकानात आम्ही अनेक विषयांवर तासनतास चर्चा करीत असू.
आज त्यांचा जन्मदिवस, जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत.
अशोक भुतडा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
शब्दांकन – हिरालाल पगडाल,
सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे