आ खताळ यांच्या हस्ते प्रणिताचे आई-वडिलांकडे पाच लाखाचा धनादेश सुपूर्त
संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर येथील सायकलिंग प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणिता प्रफुल्ल सोमन हिला युरोपमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता आर्थिक मदत म्हणून शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश आ. अमोल खताळ यांच्या हस्ते तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्त करण्यात आला . संगमनेरची कु प्रणिता सोमण हिने सायकलिंग या प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकविले होते. त्या निमित्त आमदार अमोल खताळ यांनी डॉ प्रफुल्ल सोमन यांच्या निवासस्थानी जाऊन सुवर्ण पदक विजेती प्रणिता हिचा सत्कार केला होता.
त्यावेळी प्रणिता हिला प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपमध्ये जायचे आहे. त्यामुळे तिला आर्थिक मदतीची गरज आहे. अशी अपेक्षा तिचे वडील डॉ सोमन यांनी आ. खताळ यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानंतर आ. खताळ यांनी ही माहिती शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन दिली. त्यांनी तात्काळ प्रणिता हिला आर्थिक सहाय्य म्हणून पाच लाख रुपये आ.अमोल खताळ यांच्याकडे दिले. आ. खताळ हे संगमनेरला आल्यानंतर डॉ. सोमन यांच्या निवासस्थानी जाऊन पाच लाख रुपये रकमेचा धनादेश प्रणिताच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केला. त्यामुळे डॉ सोमण परिवाराच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.