महायुतीच्या पाठीशी भक्कम युवाशक्ती,परिवर्तनासाठी द्या संधी – खताळ

0
729

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- तालुक्यात चाळीस वर्षे एकहाती सत्ता असतानाही आजही तालुक्यातील माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरला नाही. अनेक भागात आजही दुष्काळी परिस्थिती आहे. रोजगाराच्या संधी नसल्याने येथील युवकांना स्थलांतर करावे लागते. केवळ सत्ता आणि आपल्या हितचिंतकांना ठेकेदार करून तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता येथील युवा शक्ती जागृत झाली असून ती महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तालुक्यात परिवर्तन आता अटळ असून या परिवर्तनाच्या लढाईत साथ द्या असे आवाहन शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केले आहे.
संगमनेर विधानसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीने एक लढवय्या आणि तळागाळातील लोकांपर्यंत दांडगा संपर्क असलेला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारा उमेदवार अमोल खताळ यांच्या रूपाने उभा आहे. खताळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून तालुक्यात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. युवाशक्तीने त्यांची उमेदवारी उचलून धरली आहे. गावगाड्यात वाड्यावस्त्यांवर, शेताच्या बांधावर जाऊन मतदानरुपी आशिर्वाद मागताना तालुक्याच्या विकासासाठी या परिवर्तनाच्या लढाईत साथ द्या असे आवाहन अमोल खताळ करीत आहेत. या आवाहनाला युवाशक्तीचा मोठा पाठिंबा मिळत असून या लढाईकडे आता अवघ्या जिल्ह्याचे नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे.


राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री झाले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांनी अमोल खताळ यांच्यावर विश्‍वास टाकून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले. त्याचबरोबर संगमनेर विधानसभा प्रमुख पद दिले. मिळालेल्या या संधीचे सोने करत त्यांनी तालुक्यातील अनेक निराधार, परित्यक्ता, वंचित, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांचे असंख्य प्रकरणे मंजूर करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. वैयक्तिक लाभापासून सार्वजनिक लाभाच्या अनेक शासकीय योजना ना. विखे पाटील यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळवून दिला. महायुतीच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तर प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक महिलेपर्यंत पोहचवली. त्यामुळेच जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व लाडकी बहिण योजनेचे सर्वाधिक लाभार्थी या तालुक्यात नोंदवले गेले. यात खताळ यांचा मोठा वाटा आहे.
महसूल विभागात असलेली दप्तर दिरंगाई, शासकीय अधिकार्‍यांचा कामचुकारपणा, पिडीतांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे, वाळू माफिया, लँड माफिया, अवैध गौण खनिज उत्खनन यावर वारंवार आवाज उठवून, शासनदरबारी पाठपुरावा करून खताळ यांनी अंकुश निर्माण करीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या कामाची सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे. विद्यार्थी दशेपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय असल्याने, संघटनात्मक कामाची आवड असल्याने त्यांनी तालुक्यात युवकांचे मोठे संघटन निर्माण केले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे व धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीशी जोडला गेला आहे. तालुक्यात मागील काही वर्षात भाजप, बजरंग दलाच्या माध्यमातून मोठी संघटना बांधणी करण्यात आली आहे. आज ही संपूर्ण युवा संघटना अमोल खताळ यांच्या पाठीशी उभी आहे.


शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक भाजपचे पदाधिकारी श्रीराम गणपुले, जावेद जहागीरदार, हरिश्‍चंद्र चकोर, डॉ. अशोक इथापे, भारत गवळी, राहुल भोईर, श्रीराज डेरे, दिपक भगत, ज्ञानेश्‍वर कर्पे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मेहनत घेत आहे. तसेच शिवसेना पदाधिकारी रमेश काळे, विठ्ठल घोरपडे, रामभाऊ रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आबासाहेब थोरात व त्यांची सर्व शक्ती अमोल खताळ यांच्या पाठीशी उभी असल्यामुळे आणि अमोल खताळ यांनी आधी काम करून दाखवित तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तनाची साद घालत मतदानाचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यास आश्‍चर्य वाटायला नको असा आत्मविश्‍वास अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here