रोटरी क्लब, सर्वोदय पतसंस्था, रत्ननिधी ट्रस्टचा पुढाकार
संगमनेर प्रतिनिधीः संगमनेर येथील रोटरी क्लब ऑफ संगमनेर, सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था संगमनेर, आणि रत्ननिधी चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराने एक अभूतपूर्व सामाजिक सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. दोन दिवस चाललेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ टीमच्या माध्यमातून 228 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 136 रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांना 162 साहित्यांचे एक ते दीड महिन्यांत मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी LN-4 हात, पाय, आणि जयपूर फुट यासारखी अत्याधुनिक साधने देण्यात आली. रुग्णांची तपासणी, निवड आणि पुढील साहित्य वाटप यासंबंधीचे नियोजन इतके प्रभावी होते की, अनेक जिल्ह्यांतील दिव्यांग व्यक्तींनी यामध्ये सहभागी होण्यासाठी दूरवरून प्रवास केला.
संगमनेर, अकोले, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, धुळे, नाशिक अशा अनेक ठिकाणांहून आलेल्या रुग्णांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. या विशेष प्रकल्पासाठी सामाजिक जाणीवेतून सर्वोदय पतसंस्थेने देणगी स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली, तर अशोक मंडळ हॉलने 25 रुग्णांना कुबड्या प्रदान करून सामाजिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण घालून दिले. ही कृती केवळ देणगी स्वरूपात नव्हे तर समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनात आशा निर्माण करण्याचा एक प्रेरणादायक उपक्रम आहे.
रोटरी क्लबच्या सदस्यांची विशेष मेहनत- या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे, सेक्रेटरी विश्वनाथ मालानी, प्रकल्प समन्वयक अजित काकडे, प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, आनंद हासे, डॉ. प्रमोद राजुस्कर, डॉ. सुजय कानवडे, महेश ढोले, सुदीप वाकळे, खजिनदार विकास लावरे तसेच सर्व सदस्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला. रोटरी आय हॉस्पिटलच्या स्टाफने दिलेले सहकार्य देखील उल्लेखनीय आहे.
दिव्यांग रुग्णांचा प्रतिसाद: शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या प्रकल्पाचे खरे यश ठरले. ही कृतज्ञता फक्त उपक्रमाच्या यशाचे मोजमाप नाही तर भविष्यात अशा प्रकारच्या प्रकल्पांचे आयोजन करण्यासाठीची प्रेरणा आहे.रोटरी क्लबने या प्रकल्पाद्वारे केवळ दिव्यांग व्यक्तींना सहाय्य दिले नाही तर सामाजिक एकोपा, परोपकार आणि एकजुटीचा संदेश दिला आहे.
अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मकता निर्माण करतात आणि गरजवंतांना आत्मसन्मानाने उभे राहण्याची संधी देतात. या शिबिराने केवळ एका टप्प्याची पूर्तता केली नाही तर भविष्यात आणखी अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करण्याची प्रेरणा दिली आहे. रोटरी क्लबने ही सामाजिक बांधिलकी कायम ठेवत आपल्या सहकार्याचा हात पुढे केला. ज्यामुळे अशा उपक्रमांचे प्रमाण वाढेल. सर्वोदय पतसंस्था, अशोक मंडळ हॉल, रोटरी क्लबचे सदस्य आणि रोटरी आय हॉस्पिटलचा स्टाफ यांचा पुढील कार्यासाठीही पाठिंबा आणि सहकार्य लाभावे अशी अपेक्षा यावेळी अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी व्यक्त केली. यावेळी संजय राठी, दीपक मणियार, रवि पवार, नरेंद्र चांडक, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. किशोर पोखरकर, राजेंद्र खोसे, सौरभ माळस, संदीप फटांगरे, ऋषिकेश मोंढे, अतुल वखारिया, संतोष आहेर, बद्रीनारायण इंद्रायणी, प्रमोद मणियार, अनिल सातपुते, डॉ. संकेत मेहता, दिलीप मालपाणी, सुनील घुले, अमित पवार उपस्थित होते.