एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये १० मार्चपासून ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’ शिबीर

0
53

लंडनचे प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर राठोरे करणार प्रक्रिया मार्गदर्शन

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी

सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसएमबीटी हॉस्पिटल व एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे विशेष पुढाकार घेत, येत्या ९ ते १५ मार्च २०२६ यादरम्यान ‘मोफत हृदयरोग तपासणी व जटिल (कॉम्प्लेक्स) अँजिओप्लास्टी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात लंडन येथे कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुधीर राठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जटिल अँजिओप्लास्टीसाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व वरिष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांनी दिली. ते म्हणाले की, हे शिबिर १० मार्च ते १५ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिरात रुग्णांची तपासणी सुरू राहणार आहे. डॉ. राठोरे हे १३ व १४ मार्च रोजी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून रुग्णांची ‘जटिल अँजिओप्लास्टी’ करण्यासाठी मार्गदर्शन करतील. डॉ. राठोरे हे लंडन येथील एनएचएस हॉस्पिटल येथे ‘कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मिळणार असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या सात दिवसीय शिबिरामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरील अॅडव्हान्स कोरोनरी इंटरव्हेन्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये क्रॉनिक टोटल ऑक्लूजन (सीटीओ) अँजिओप्लास्टी, गुंतागुंतीची व जटिल अँजिओप्लास्टी, लेफ्ट मेन व बायफर्केशन अँजिओप्लास्टी, रोटेशनल अॅथरेक्टॉमी (रोटाब्लेशन), आयव्हस (आयव्हीयूएस) व रोटा ओसीटी यांसारख्या अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जाणार आहेत. तसेच हृदयविकाराचा धक्का बसलेल्या रुग्णांसाठी तातडीची अँजिओप्लास्टी (प्रायमरी पीसीआय) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच छातीत दुखणे, जळजळ होणे, चालताना दम लागणे किंवा अचानक दरदरून घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ती हृदयविकाराची असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी या शिबिरात मोफत आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी केले. विशेष म्हणजे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या रुग्णांना या शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले. यासोबतच या शिबिराच्या अधिक माहितीसाठी हृदयविकार विभागाच्या ७७४४९१३९१३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे शिबिर कोणासाठी उपयुक्त?

ज्या रुग्णांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेजमुळे बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे, परंतु बायपास करणे धोकादायक ठरू शकते किंवा ज्यांना बायपासची भीती वाटते, अशा रुग्णांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त आहे. कॅल्शियम साचल्यामुळे कडक झालेल्या रक्तवाहिन्या, रोटा, आयव्हस (आयव्हीयूएस) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिलेले रुग्ण तसेच ज्या रुग्णांच्या धमनीतील ब्लॉकेज कठीण किंवा गुंतागुंतीच्या ठिकाणी आहे आणि ज्यासाठी तज्ज्ञ हृदयविकार तज्ज्ञांची आवश्यकता असते, अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असलेली साधनसामुग्री आणि सुसज्ज क्रिटिकल केअर विभाग यामुळे मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी होत असलेल्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया एसएमबीटीत करणे शक्य झाले आहे. अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कौशल्य अवगत असणे गरजेचे असते. हे कौशल्य येथील तज्ञांकडे असल्यामुळे गेल्या काही वर्षांत याठिकाणी फादर ऑफ कार्डिओलॉजीस्ट डॉ. सम्युअल मॅथ्युज, दिवंगत सीव्हीटीएस सर्जन डॉ. एस. एस. भट्टाचार्य, बाल हृदयविकार तज्ञ डॉ. गुयेन लॅन ह्यू, प्रसिद्ध टावी (टीएव्हीआय) कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी तज्ञ डॉ. यान कोवाक यांनीही याठिकाणी उपस्थित राहून हृदयविकार प्रक्रिया केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here