दोन आरोपी अटकेत, ९ ट्रॅक्टर, २ दुचाकी जप्त; ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -शेतकर्यांची नावे वापरून ट्रॅक्टर फायनान्सवर घेऊन त्यांची फसवणूक करणार्या टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 9 ट्रॅक्टर व 2 मोटारसायकली असा सुमारे 71 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने केली. फसवणुकीची युक्ती फिर्यादी शेतकर्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) व त्याचा साथीदार अभिजीत सुनिल भांडवलकर (रा. सिव्हिल हाडको, अहमदनगर) हे तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत करतो असे सांगत शेतकर्यांची कागदपत्रे घेत.
यानंतर त्यांनी एलटी फायनान्स कंपनीमार्फत कर्ज घेऊन ट्रॅक्टर शेतकर्यांच्या नावावर घेतले, परंतु काही दिवसांनी ट्रॅक्टर पळवून नेले. सहा महिन्यांसाठी ट्रॅक्टर माझ्याकडे कामाला लावा, मी दरमहा 30,000 व पुढील सहा महिन्यांचा हप्ता देतो, असे आमिष दाखवले जात असे.
ट्रॅक्टर मिळाल्यानंतर आरोपी शेतकर्यांना ठरलेले पैसे न देता फोन बंद करून फरार होत, अशी फसवणूक अनेक शेतकर्यांसोबत करण्यात आली. याप्रकरणी राजूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 401/2025, भा.न्या.सं. कलम 316(2), 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी वारंवार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांत वावरत असल्याचे समोर आले. दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी अहमदनगर परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून दोघांनाही अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी फसवणुकीतून मिळालेले ट्रॅक्टर सिल्लोड (जि. संभाजीनगर) येथील करण राजपूत याला प्रत्येकी 4 लाख रुपयांत विकल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्यांनी इतर शेतकर्यांचीही फसवणूक केल्याचे उघड केले. आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवून खालील ठिकाणांहून ट्रॅक्टर आणि दुचाकी जप्त केली – शिर्डी – 1 ट्रॅक्टर, अहमदनगर – 3 ट्रॅक्टर, श्रीगोंदा – 2 ट्रॅक्टर, नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) – 2 ट्रॅक्टर, सिन्नर (जि. नाशिक) – 1 ट्रॅक्टर, श्रीगोंदा – 1 मोटारसायकल, नारायणगाव – 1 मोटारसायकल, एकूण 71,70,000 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे (संगमनेर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोहेकॉ दादासाहेब लोंडे, सचिन धनाड, पोना संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे, दत्तात्रय मेंगाळ, बापूसाहेब हांडे, राहुल सारवंदे, तसेच राजूर, शिर्डी, श्रीगोंदा व नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.





















