घुलेवाडीत तीव्र पाणीटंचाई

0
1762

संतप्त नागरिकांनी ठोकले ग्रामपंचायतला टाळे

घुलेवाडीकरांची पाणी समस्या अनेक वर्षांची असून त्यावर तोडगा म्हणून सुरूवातील जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना राबविण्यात आली. मात्र ही योजना फेल गेल्यानंतर आता 87 कोटी रूपयांच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून नविन योजना राबविली जात आहे. या योजनेचे ( पाईप लाईन) बरेचशे काम पुर्ण झाले आहे. मात्र साठवण बंधार्‍याचे काम पुर्ण न झाल्यामुळे या योजनेचा लाभ घुलेवाडीकरांना कधी मिळणार याबाबत शंका आहे. साठवण बंधार्‍याचे काम लवकरच पुर्ण होईल असे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र निश्चित कालावधी तेे ही सांगू शकत नाही. जो पर्यंत साठवण बंधारा पुर्ण होत नाही तोपर्यंत घुलेवाडीत पाणी टंचाई कायम राहणार आहे.

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – संगमनेर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एक सर्वात मोठी ग्रामपंचायत असणार्‍या घुलेवाडीतील नागरीकांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या गावात नळाला 15 ते 20 दिवसांनी पाणी येत असल्याने येथील नागरीकांना पिण्यासाठी देखील विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी महिलांचे प्रचंड हाल होत असल्याने व कामधंदा सोडून वणवण फिरावे लागत असल्याने ग्रामपंचायतला वारंवार विनंती अर्ज करूनही नागरीकांना पाणी न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी आज घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावत आपला संताप व्यक्त केला.

संगमनेर शहरालगत असल्याने घुलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण झाले आहे. रोज या परिसरात मोठ-मोठ्या वसाहती उभ्या रहात आहे. त्यामुळे या नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे घुलेवाडी ग्रामपंचायतच्या आवाक्या बाहेर गेले आहे. त्यातच घुलेवाडी ग्रामपंचायतीकडे पाणी साठवणूकीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवरा नदीला अवर्तन असल्यास घुलेवाडीकरांना पाणी मिळते. मात्र अवर्तन संपल्यानंतर पाण्यासाठी येथील नागरीकांना विशेषत: महिलांना वणवण भटकंती करावी लागते. पिण्याबरोबरच वापरण्यासाठी देखील विकत पाणी घ्यावे लागत आहे. पंधरा ते 20 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्याने येथील नागरीकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहे. सध्या परिस्थितीत 7 ते 8 टँकरद्वारे घुलेवाडीकरांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र गावच्या आसपास वसलेल्या अनेक उपनगरातील नागरीकांना स्वत: पदरमोड खर्चाने टँकर आणून तहान भागवावी लागत आहे.

सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड असल्याने व आगामी काळात ती आणखी वाढणार असल्याने खबरदारी म्हणून घुलेवाडी ग्रामपंचायतने आसपासच्या 6 विहिरी अधिग्रहण केल्या आहे. मात्र या विहिरींचीही पाणी पातळी सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आगामी काळात देखील ग्रामपंचायतीला नविन पाण्याचे स्त्रोत शोधावे लागणार आहे. दरम्यान कर रूपाने प्रचंड महसूल गोळा करणारी ग्रामपंचायत असतांनाही नागरी सुविधा पुरविण्यात मात्र सदर ग्रामपंचायतील कायमच अपयश येत आहे. बोगस नळ कनेक्शन, अतिक्रमण, रस्ते, पाणी, वीज या समस्यांचा कायमच येथील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे 60 ते 70 हजारांची लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतीला अनेक वर्षांचा पाणी प्रश्न सोडविता येत नसल्याने नागरीक संतप्त आहे. त्यातूनच आज या ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रकार घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here