चोरी सत्र थांबत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर नागरीक संताप व्यक्त करत आहे.
संगमनेर (दैनिक युवावार्ता)
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बु. परिसरात मंगळवारी पहाटे चोरट्यांनी अनेक ठिकाणी धाडसी चोर्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील पारेगाव बु. येथे मंगळवारी पहाटे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी एस. जनरल स्टोअर्स व किराणा माल हे दुकान फोडले. या दुकानातील किराणा माल तसेच रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर दुकानाशेजारील एका घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. तेथे दागिन्यांसह रोख रक्कम लुटली. त्यानंतर काही अंतरावर असणार्या सोमनाथ गडाख यांच्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी करत दोन तोळे सोन्याचे दागिणे व चार हजार रूपयांची रोकड लुटून नेली. ही लुट झाल्यानंतर चोरट्यांनी पुढचे लक्ष्य सुभाष विठ्ठल सोनवणे यांच्या घराला केले. कपाटात ठेवलेले 25 हजार रूपये रोख व सोन्याचे दागिणे चोरून नेले. जवळ असलेल्या रतनबाई गडाख यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला
पहाटे चोरट्यांनी केलेल्या या धाडसी चोर्यांमुळे ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. याबाबत बुधवारी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत असले तरी या परिसरात अनेकवेळा धाडसी चोर्या आणि लुटमार झालेली आहे. मात्र चोरट्यांचा शोध लागत नसल्याने आणि हे चोरी सत्र थांबत नसल्याने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर नागरीक संताप व्यक्त करत आहे.