युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात असणारा व पावसाळ्यात असंख्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा सुप्रसिद्ध तामकडा धबधबा सुरक्षेच्या दृष्टीने मात्र धोकादायक आहे. त्यामुळे परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह पर्यटकांमधून होत आहे.
पुणे व नाशिक या दोन शहरांना जोडणार्या चंदनापुरी घाटात सुप्रसिद्ध असा तामकडा धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात असंख्य पर्यटक निसर्गाचा हा अद्भुत अविष्कार पाहण्यासाठी याठिकाणी आवर्जुन भेट देतात. मात्र, अनेक हौशी पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्याजवळ सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नाही. त्यामुळे अनेक पर्यटक थेट डोंगराच्या टोकावर जातात. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच त्याठिकाणी कोणतेही सुरक्षा रक्षक तैनात नसतात. त्यामुळे हौशी पर्यटकांना कोणी अटकाव करत नाही. त्यासाठी वेळीच येथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या महामार्गावरुन जाणारे, असंख्य पर्यटक येथे थांबून निसर्गाचा आनंद लुटत असतात.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच तामकड्यावरून पडून एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. परंतु, दरवर्षी यावेळी धो धो कोसळणार्या धबधब्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मोठ्या पावसानंतर हा धबधबा पुन्हा एकदा उंचावरून कोसळताना दिसणार आहे