राजकारणापेक्षा कुटूंब महत्त्वाचे – आ. तांबे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यात राजकीय सत्तासंघर्ष सुरू असल्याच्या बातम्या अधूनमधून नेहमीच समोर येत असतात. आ. तांबे थोरातांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार अशा वावड्या देखील अधूनमधून उडवल्या जातात. त्यामुळे संगमनेरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ देखील उडत राहते.
या पार्श्वभूमीवर आ. सत्यजित तांबे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले आणि आपले मामा बाळासाहेब थोरात यांच्या संबंधावर प्रकाश टाकून आपले नाते किती घट्ट आहे याची प्रचिती दिली आहे.

आ. तांबे म्हणतात, माझ्यात आणि माझ्या मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणार नाही. हे माझं आयुष्याचे तत्त्व आहे. माझ्या राजकीय महत्त्वकांक्षा पेक्षा माझा परिवार मोठा आहे, हे मी जाणतो. त्यामुळे कधीही मी परिवाराची लाईन क्रॉस करून राजकीय महत्त्वाकांक्षाला महत्त्व देणार नाही. हे आज नाही हे मी ज्या दिवशी राजकारणात आलो त्याच दिवसापासून ठरवलेले आहे. मुळातच माझा राजकारणाचा प्रवेश असेल, माझ्या वडिलांचा राजकारणाचा प्रवेश असेल तो आमचा प्रवेश हाच मामांना मदत करण्यासाठी झालेला आहे.

आमच्या राजकीय महत्त्वकांक्षेपेक्षा त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा देखील आमच्यासाठी महत्त्वाची आहे. राजकीय टिका टिपण्णी होत असेल म्हणून आमच्यात दुरावा कधी निर्माण होऊ शकत नाही. माझ्या वडिलांच्या जागेवरती ते आहेत. माझे आणि त्यांचे संबंध अतिशय प्रेमाचे आणि चांगले आहेत आणि चांगलेच राहतील. आमच्यात कुणीही दुरावा निर्माण करीत नाही आणि करू पण शकत नाही. मी बाळासाहेब थोरात यांची लाईन क्रॉस करून आजपर्यंत काहीच केलं नाही आणि इथून पुढच्या काळातही करणार नाही. अशी भावनिक प्रतिक्रिया आ. सत्यजित तांबे यांनी व्यक्त करीत अनेक प्रश्न निकाली काढले आहेत.