वीज नसल्यास सिग्नल बंद; ट्रॅफिक पोलिस गायब

ग्रीन सिग्नल केवळ 20 सेकंदाचा, बेशीस्त वाहकांना चाप नाही

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील बस स्थानक, दिल्ली नाका, अकोले नाका हे वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात जास्त गजबजलेले भाग आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व वाहन व्यवस्थापनासाठी बराच काळ प्रतीक्षा झाल्यानंतर अखेर सिग्नल यंत्रणा सुरू झाली होती. मात्र लाखो रूपये खर्च करूनही या सिग्नल यंत्रणेला मुहूर्त मिळाला नाही. त्यानंतर काही वर्षांनंतर पुन्हा बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र तिची आजची अवस्था देखील असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
सुरू झालेली सिग्नल यंत्रणा दिलासा देणारी होती. मात्र अवघ्या काही महिन्यांतच ही सिग्नल यंत्रणा चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

डावीकडे वळणार्यांची कायमची कोंडी
बसस्थानक परिसरात 60 सेकंदांचा रेड सिग्नल लावण्यात आला आहे. पण या वेळेत नाशिक रोडकडे जाणार्या गाड्या, रिक्षांची रांग आणि अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहने अडकून पडतात. त्यामुळे डावीकडे वळणार्या वाहनधारकांची प्रचंड कोंडी होते.
सिग्नल सुटल्यानंतर गाड्या पुढे सरकत असतानाच एखादा दुचाकीस्वार किंवा चारचाकी चालक मधेच घुसतो आणि पुन्हा रांग थांबते.
केवळ 20 सेकंदाचा ग्रीन सिग्नल
विशेष म्हणजे ग्रीन सिग्नलचा कालावधी फक्त 20 सेकंदांचा असल्याने बर्याच वाहनांना वेळेत मार्ग मिळत नाही. परिणामी चालक व प्रवासी या दोघांचाही त्रास वाढतो व अपघाताची शक्यताही निर्माण होते.

ट्रॅफिक पोलिसांचा अभाव
सिग्नल बसवले म्हणजे आपली जबाबदारी संपली या भावनेतून वाहतूक पोलिसांची उपस्थिती क्वचितच दिसते. नागरिकांच्या मते, काही दिवस तरी कठोरपणे शिस्त लावली गेली असती, तर बेशिस्त चालकांचे धाडस कमी झाले असते. पण पोलिसांच्या अनुपस्थितीत नियम तोडणार्यांची चांगलीच मजा सुरू आहे.

फ्लेक्समुळे अधिक अडचणी
सध्या शहरात दोन सत्ताकेंद्र निर्माण झाल्याने आपल्या नेत्यांच्या प्रचार प्रसारासाठी फ्लेक्सद्वारे दोन्ही बाजूने चढाओढ सुरू आहे. यातच सण, उत्सव व कार्यक्रमांच्या फ्लेक्सचा प्रचंड वापर सुरू आहे. वर्दळीच्या ठिकाणी कमानी व होर्डिंग्ज उभारल्याने सिग्नल परिसर आणखीच गोंधळलेला दिसतो. महामार्गाच्या मध्यभागी भव्यदिव्य कमानी उभारल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतोच शिवाय मोठा अपघात घडण्याची शक्यताही निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच असा अपघात झाला होता मात्र दुर्घटना टळली. अनेक वेळा या फ्लेक्सकडे बघण्याच्या नादात सुध्दा वाहन चालक गोंधळातच रस्ता बदलतात. दृश्य अडथळे निर्माण झाल्याने वाहनचालकांना रस्ता नीट दिसत नाही.

प्रशासनावर नागरिकांचा रोष
नगरपालिका प्रशासनाने फक्त सिग्नल बसवून जबाबदारी संपवली आहे, पण त्याची कार्यक्षमता व परिणामकारकता तपासली जात नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की – सिग्नलचा वेळ वाहतुकीच्या प्रमाणानुसार बदलला पाहिजे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची डावीकडे भिंत फोडली असून झाड आणि भिंत यामधून दुचाकी सहज जाऊ शकतात मात्र हे काम झालेले नाही. येथील रिक्षा स्टॉप थोडा मागे घेतला तर जाणार्यांना सोयीचे होईल. शालेय वेळेत व गर्दीच्या तासात पोलिसांचा नियमित बंदोबस्त असला पाहिजे. फ्लेक्स व कमानींवर कठोर बंदी घालून रस्ते अडथळा मुक्त केली पाहिजे. त्याचबरोबर या गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेले व्यावसायिक अतिक्रमण, अवैध पार्किंगवर देखील निर्बंध लावले पाहिजेत.

इतर शहरांशी तुलना
मोठ्या शहरांमध्ये रस्ते रूंद असतात. त्यामुळे तेथील सिग्नल यंत्रणा देखील सुरळीत काम करते. मात्र संगमनेरमध्ये आधीच अरूंद रस्ते, त्यात अनेक अडथळे आणि बसवलेले सिग्नल यांचे समीकरण जुळविताना प्रशासनाकडून जी काळजी घेणे गरजेचे आहे ती कुठेही घेताना दिसत नाही. मोठ्या शहरांत सिग्नल यंत्रणा सेन्सर-आधारित असून गर्दीनुसार आपोआप वेळ ठरवते. संगमनेरमध्ये मात्र जुनी व एकसाची प्रणाली वापरली जात असल्याने ती कार्यक्षम ठरत नाही.
नागरिकांची ठाम मागणी
नागरिकांचा सूर स्पष्ट आहे –
सिग्नल लावून वाहनचालकांचा खेळ करायचा असेल तर अशी व्यवस्था ठेवण्यापेक्षा ती बंद करून पोलिसांकडे कडक ड्युटी लावावी. प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीत सुधारणा केली नाही, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू.

युवावार्ताची भूमिका
दैनिक युवावार्ता नेहमीच नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने मांडत आलेले आहे. शहरातील सिग्नल प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सातत्याने आवाज उठवणार आहोत. शहराची वाहतूक ही फक्त सोयीची नव्हे, तर सुरक्षेशी संबंधित बाब आहे. प्रशासनाने वेळ न दवडता सुधारणा केल्या पाहिजेत.