संगमनेर सेवा समितीची अभूतपूर्व भव्य प्रचार रॅलीने सांगता
तुम्ही साथ द्या, विकासाची हमी मी देतो – आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर (प्रतिनिधी) -सत्यजित तांबे यांनी संगमनेकरांसाठी विकासाचे व्हिजन मांडले आहे. येथील सुज्ञ मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून नगरपालिकेत संगमनेर सेवा समितीती सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच प्रचाराच्या या सांगता सभेला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे विरोधकांच्या रॅलीकडे नागरीकांनी पाठ फिरवली. गर्दी नाही म्हणून काही पथकांना बोलवावे लागले ते ही थकले आणि आलेले पाहुणे देखील निघून गेले. अशी अवस्था त्यांची झाली आहे. येथील सुज्ञ मतदारांनी आता संगमनेर नगरपालिकेचे सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची याचा निर्णय घेतल्याने सत्यजित तांबे यांची जबाबदारी वाढली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर सेवा समितीच्या सांगता सभेत नगरपालिका प्रांगणात ते बोलत होते.

संगमनेर नगर परिषदेसाठी उद्या मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीचे वतीने आज सोमवारी दुपारी शहरातून भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली जाणता राजा मैदान येथून निघालेली पदयात्रा विविध मार्गाने जाऊन नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील लालबहादूर शास्त्री चौक येथे भव्य सभा झाली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आमदार सत्यजित तांबे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिली तांबे, उद्योजक मनिष मालपाणी, डॉ. जयश्री थोरात सर्व प्रभागातील सेवा समितीचे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्या कामाचे कौतुक केले. संगमनेरच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली भूमिका, मांडलेले व्हिजन याला संगमनेरकर निश्चित साथ देतील.अतिशय चांगले उमेदवार त्यांनी संगमनेरकरांना दिले आहेत. शेजारील हस्तक्षेपाबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की आपण स्वयंभू आहोत स्वाभिमानी आहोत आपल्याला तिसऱ्या कुणाची मध्यस्थीची गरज नाही.

या रॅलीमध्ये बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बाहेरील लोकांचा संगमनेरच्या प्रगतीवर डोळा आहे आणि ते संगमनेर मधील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून येथील विकास मोडून पाहत आहे. रेल्वे पळवली आता संगमनेर शहरातील पाणी पळवण्याचा त्यांचा डाव आहे. हे पाणी मिळवण्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे याकरता ही नगरपालिका त्यांना ताब्यात पाहिजे. विकास करण्याची धमक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असून बाकीचे फक्त टोल घेण्यात व्यस्त आहे आणि यामुळे संगमनेर शहर मागील एक वर्षापासून अशांत झाले आहे. सेवा समिती पुढील पाच वर्षाचे व्हिजन घेऊन अत्यंत काटेकोरपणे काम करणार असल्याचे ते म्हणाले. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला विकासाची हमी देतो असेही आमदार तांबे यावेळी म्हणाले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिली तांबे यांनी आपण विकास कामांसाठी उमेदवारी करत असून आमच्या सर्व 30 उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्रास्ताविकेमध्ये वंचित बहुजनच्या उत्कर्षा रूपवते यांनी सांगितले की संगमनेरमधील दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत आणि विजय संगमनेर सेवा समितीताच होईल असेही रूपवते यांनी सांगितले. अभूतपूर्व आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या रॅलीमध्ये सुमारे 15000 नागरिकांनी सहभाग नोंदवला.






















