काँग्रेसकडून शिंदे गटावर आरोप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील 8 रस्त्यांसाठी मंजूर केलेली 40 कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आल्याने तालुक्यात संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हा निर्णय केवळ संगमनेर तालुक्यासाठीच घेण्यात आला असून जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यांची कामे रद्द झालेली नाहीत. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने अपूर्ण माहितीवर आधारित पत्रकबाजी केल्याचा आरोप शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केला आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40.73 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून एकूण 30.570 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार होती. यात डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली ते जवळेकडलग, खरशिंदे ते खांबे, मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी, साकुर ते बिरेवाडी, शिंदोडी ते ठाकरवाडी, आणि तासकरवाडी ते खंडेराया वाडी या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश होता.

या कामांना 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र 7 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या नवीन अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त संगमनेर तालुक्यातील कामांसाठीच घेण्यात आला असून जिल्ह्यातील किंवा इतर कोणत्याही तालुक्यांमधील कामे रद्द करण्यात आलेली नाहीत, असे सचिन दिघे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दिघे यांनी शिंदे गटाच्या एका प्रवक्त्यावर अपूर्ण माहितीच्या आधारे दिशाभूल करणारी पत्रकबाजी केल्याचा आरोप केला आहे. प्रवक्त्याने जिल्ह्यातील कामे रद्द झाल्याचे म्हटले आहे, पण ही वस्तुस्थिती नसून केवळ संगमनेर तालुक्यातील कामे रद्द झाली आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याकडून रस्त्यांच्या या कामासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक व योग्य माहिती घेणे अपेक्षित होते.

नवीन लोकप्रतिनिधींनी गेल्या आठ महिन्यांत तालुक्यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नाही. उलट त्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी जुनीच कामे रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा डाव आखल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.पद्माताई थोरात यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, नवीन लोकप्रतिनिधी ज्या कामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करत आहेत त्या कामांना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातच मंजुरी मिळाली होती. त्यांनी खोटी पत्रकबाजी करून जनतेची दिशाभूल करू नये.