निधीचा अपव्यय; लोकप्रतिनिधींनी प्रकर्षाणे लक्ष द्यावे

अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)-
संगमनेर शहरातील सार्वजनिक उद्यानांची उभारणी नागरिकांना आरोग्य, मनोरंजन व विरंगुळ्याचे केंद्र मिळावे या उदात्त उद्देशाने करण्यात आली होती. नगरपरिषद, राज्य शासन आणि केंद्र सरकारकडून लाखो-कोटींचा निधी खर्च करून विविध गार्डन उभारली गेली. लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, आरामदायी आसनव्यवस्था, कारंजे, हरितपट्टी, वृक्षारोपण अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात या उद्यानांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार, दुर्लक्ष आणि निधीचा अपव्यय यामुळे ही उद्याने आज उध्वस्त अवस्थेकडे जात आहेत.

उद्यानांचा खचलेला दर्जा
शहरातील अनेक गार्डनमध्ये गवत अनियंत्रित वाढलेले असून कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. या कचर्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यूच्या धोक्याने नागरिक चिंतित आहेत. बाके तुटलेली, मुलांची खेळणी मोडकळीस आलेली, झाडे सुकलेली आणि फांद्या धोकादायक पद्धतीने लटकत आहेत. कारंजे बंद पडलेली, तर भिंती व वास्तू पडझड झालेल्या आहेत. स्वच्छता व देखभाल नसल्यामुळे उद्यानांचा मूळ उद्देशच हरवला आहे.

नागरिकांचा उद्यानांवरील विश्वास उडाला
स्वच्छता, सुरक्षा आणि सौंदर्याचा पूर्ण अभाव असल्याने लहान मुले व महिला या गार्डनकडे फिरकायलाही घाबरत आहेत. ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी काही ठिकाणी जात असले तरी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची, थुंकदानीची आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक उद्याने ओस पडली असून दारुड्यांचे आणि गंजाड्यांचे अड्डे बनली आहेत.

निधी खर्च होतो पण उपयोग शून्य
दरवर्षी या गार्डनच्या देखभाल आणि मेंटेनन्ससाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होतो. नुकतेच केंद्र सरकारने ‘नमो उद्यान योजना’ अंतर्गत संगमनेरसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र मागील अनुभव पाहता या निधीचाही अपव्यय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. योग्य नियोजन, काटेकोर देखरेख आणि प्रामाणिक अंमलबजावणीचा अभाव हा मुख्य अडथळा असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

महापुरुषांच्या नावावर राजकारण, पण पुतळे नाहीत
शहरात नेहरू गार्डनसह महापुरुषांच्या नावाने अनेक उद्याने उभारली गेली असली तरी त्याठिकाणी त्या महापुरुषांचे पुतळे नाहीत. ताजणे मळा येथील इंदिरा गांधी उद्यानात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे, मात्र त्याचाही सांभाळ होत नाही. स्वच्छ सुंदर अभियानाच्या गाजावाज्याला हरताळ फासला गेला असून उद्याने केवळ नावालाच उभी असल्याचे चित्र आहे.
नागरिकांची ठाम मागणी
सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरण, सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, खेळणी, जॉगिंग ट्रॅक, दिवे, महापुरुषांचे पुतळे यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा ही उद्याने भ्रष्टाचाराचे आणि पैशांच्या उधळपट्टीचे आणखी एक उदाहरण ठरतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

नेहरू उद्यानाची दुर्दशा
संगमनेरमधील सर्वात जुने व सर्वात मोठे नेहरू उद्यान आज दुर्दशेत सापडले आहे. सुरूवातीला येथे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, विविध फुलझाडे – फळझाडे, मत्स्यालय, लहानग्यांसाठी रेल्वेगाडी, पाळणे, झोके, लॉन्स, घसरगुंडी, सी-सॉ यांसारखी करमणुकीची साधने होती. मोठी हिरवळ व खाऊगल्लीमुळे ही बाग गजबजलेली असे. मात्र आता अनेक खेळणी तुटलेली, अपघातानंतर रेल्वे बंद, प्राणी-पक्षी गायब, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेले विरंगुळा केंद्रही देखभालीअभावी दुरावस्थेत आहे. नागरिकांना या उद्यानाचे वेळापत्रकसुद्धा माहिती नसल्याने त्यांचा त्रास वाढला आहे.
राजकीय प्रतिनिधींनी लक्ष द्यावे
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या गंभीर विषयात लक्ष घालून प्रशासनाला तातडीने सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांची आहे. नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे का होईना, पण गार्डनचा विषय चांगल्या प्रकारे हाताळला जाईल, अशी आशा नागरिकांना वाटते. सार्वजनिक उद्याने ही शहराच्या सौंदर्याची, आरोग्याची आणि संस्कृतीची ओळख असतात. मात्र संगमनेरमधील सद्यस्थिती पाहता ही उद्याने भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि निधीच्या अपव्ययाची जिवंत उदाहरणे बनत आहेत. नागरिकांनी आवाज उठवला आहे, आता प्रशासन व जनप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारून कृती करणे अत्यावश्यक आहे.

युवावार्ताची भूमिका
सार्वजनिक उद्यानं ही फक्त हिरवळ, खेळणी, बाकं वा कारंज्यापुरती मर्यादित नसतात. ती म्हणजे नागरिकांच्या आरोग्याची श्वासवायूची फुफ्फुसं, मुलांच्या आनंदाचं खेळाचं मैदान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शांततेचं विरंगुळ्याचं ठिकाण. पण संगमनेरातील उद्यानांची जी दुर्दशा उभी ठाकली आहे ती केवळ प्रशासनाच्या निष्क्रियतेचं आणि निधीच्या अपव्ययाचं उदाहरण आहे.
नगरपालिका, शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या उद्यानांकडे दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांचा खर्च केवळ कागदोपत्रीच झाला आहे. महापुरुषांच्या नावाने उद्यानं उभारली जातात; पण त्यांचा दर्जा आणि उद्देश मात्र हरवून बसतो. यामुळे नागरिकांना लाभ मिळण्याऐवजी भ्रष्टाचार, देखरेखीचा अभाव आणि निधीची उधळपट्टी हेच समोर येत आहे.
युवावार्ता ठामपणे सांगतो की, ही स्थिती अधिक काळ सहन केली जाणार नाही. नागरिकांच्या पैशाचा योग्य तो उपयोग होऊन उद्यानं खर्या अर्थाने सुशोभित, सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त व्हावीत हीच अपेक्षा. येणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का होईना, परंतु उद्यानांच्या विकासाचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडविला जावा. सार्वजनिक उद्यानं ही नागरिकांची गरज आहे, राजकीय दिखावा किंवा भ्रष्टाचाराचं साधन नव्हे. युवावार्ता नागरिकांसोबत ठामपणे उभं राहील आणि या विषयावर प्रशासन व लोकप्रतिनिधींना जबाबदार धरण्याचं काम करत राहील.