मध्यवर्ती भागातील रंगतदार लढती

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील मध्यवर्ती भागाचा, व्यापारी भागाचा समावेश असलेल्या प्रभाग सात आणि आठ मध्ये यावेळी पुरूष वार्डात मोठी रंगतदार लढाई होत आहे. सात ब मध्ये माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग संगमनेर सेवा समितीकडून पुन्हा एकदा मैदानात उतरले असून त्यांचा मुकाबला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होत आहे. आठ ब मध्ये संगमनेर सेवा समितीकडून युवा नेते गणेश गुंजाळ विरूद्ध भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश राठी मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर महिला वार्ड देखील चुरशीच्या लढतीत मागे राहणार नसल्याचे दिसते आहे. सात अ मधून माजी नगरसेविका मालती धनंजय डाके विरूद्ध महायुतीकडून पुनम धोंडीराम अनाप मैदानात आहेत तर प्रभाग आठ अ मध्ये भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे या महायुतीकडून उभ्या असून त्यांना संगमनेर सेवा समितीच्या दिपाली पंचारिया या थेट लढत देत आहे. अशा मातब्बर उमेदवारांचे हे दोन प्रभाग आहे.

शहराचे हृदय समजले जाणारे वार्ड नवीन नगर रोड, शिवाजी महाराज पुतळा, तहसील कार्यालय परिसर, देवाचा मळा, प्रांत कार्यालय परिसराचा हा भाग असल्याने या प्रभागाचे नेतृत्व सक्षम उमेदवारांनी करावे यासाठी ही निवडणूक होत आहे. सुरूवातीपासून आघाडी आणि महायुतीकडून या प्रभागातून कोण उमेदवारी करणार याबाबत मोठी उत्सुकता होती. आघाडीकडून माजी नगरसेवक किशोर पवार यांना उमेदवारी मिळणार होती मात्र त्यांनी ऐनवेळी प्रभाग चार मध्ये एन्ट्री मारल्याने या ठिकाणी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्तेे गणेश गुंजाळ यांना उमेदवार घोषित करण्यात आली. त्यांच्या मातोश्री सुहासिनी गुंजाळ यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले होते. त्यांनी केलेली विकास कामे, त्यांचा असलेला जनसंपर्क, पक्षाची खंबीर साथ याचा मोठा फायदा गणेश गुंजाळ यांना मिळणार आहे. गणेश गुंजाळ देखील विविध चळवळीत, सामाजिक, राजकीय कार्यात कार्यरत असतात. विविध सार्वजनिक उत्सवात गणेश गुंजाळ यांचा मोठा सहभाग असतो. त्याचा देखील त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत संगमनेर सेवा समितीच्या वतीने काँग्रेसचे युवा कार्यकर्ते जीवन पंचरिया यांच्या पत्नी दिपाली पंचारिया यांना उमेदवारी देण्यात आली. पंचारिया काँग्रेस चळवळीत सक्रिय सहभागी असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने जीवन पंचारीया यांच्या संपर्काचा, त्यांच्या कामाचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून गणेश गुंजाळ त्याचबरोबर पंचाया कुटुंब या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेताना या दोन्ही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

प्रभाग 7 मध्ये भाजपकडून शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रकाश राठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रकाश राठी हे अनुभवी राजकारणी आहे. तर पायल ताजणे या लढाऊ आणि उच्चशिक्षित महिला कार्यकर्त्या आहेत. भाजपच्या शहराध्यक्ष म्हणून त्या प्रभावीपणे पक्षात आणि शहरात काम करत आहेत. सुरुवातीला पायल ताजणे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार असे बोलले जात होते. मात्र तडजोडीच्या राजकारणामुळे ही संधी हुकली. त्यांना प्रभाग सात मधून उमेदवारी मिळाली. तेव्हापासून त्यांनी व प्रकाश राठी यांनी महायुतीच्या वतीने प्रत्येक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन केले आहे. स्वतःबरोबरच इतर पक्षाच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी येथे लक्षणीय ठरत आहे.
प्रभाग 7 अ मध्ये आघाडी, महायुतीविरूद्ध अपक्ष म्हणून पुजा कतारी त्याचबरोबर किशोरी सुभाष मंडलीक लढा देत आहेत. 7 ब मध्ये नितिन अभंग यांच्या विरूद्ध अमित मंडलीक हे महायुतीचे सक्षम उमेदवार तसेच राष्ट्रवादीचे प्रसाद गोरे, अपक्ष अभय खोजे रिंगणात आहेत. प्रभाग 8 अ मध्ये दोन्ही प्रस्तापितांविरूद्ध 2 अपक्ष म्हणून मोमीन फातिमा शोएब, फातमाबी पठाण रिंगणात आहेत. तर 8 ब मधून अपक्षमधून साकीब अनिस बागवान, असिफ इलियास शेख नशिब अजमावत आहेत.

लोकसख्या एकूण- 4720, अ.जा.-312, अ.ज.- 253. व्याप्ती – देवाचा मळा, सावता माळी नगर, एस टी. स्टॅण्ड,पंजाबी कॉलनी, वकिल कॉलनी, अभंग मळा, माळीवाडा, संजय गांधी नगर क्रिडा संकूल. उत्तर- मेडीकव्हर हॉस्पिटल समोर नगरपरिषद हद्दीपासून ते अकोले बायपास ते पेटीट कॉलेज सर्कल ते बस स्टॅण्ड ईशान्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पर्यंत. पूर्व- बस स्टॅण्ड ईशान्य कॉर्नर, नाशिक -पुणे हायवे ते छ. शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा चौक पर्यंत, दक्षिण- मोमीनपुरा चौक ते तहसील कार्यालय ते बाप्ते झेरॉक्स सर्कल ते नेहरू गार्डन मुख्य प्रवेशद्वार ते महात्मा फुले पुतळा, मेन रोड ते अकोले नाका ते म्हाळुंगी नदी पूर्व बाजू ते म्हाळुंगी नदी व म्हानुटी नाला यांचा संगम ते राजापूर रोड पगूबाई गोडाऊन कॉर्नर पर्यंत. पश्चिम- राजापूर रोड पगूबाई गोडाऊन कॉर्नर, नगरपरिषद हद्द ते मेडिकव्हर हॉस्पिटल समोर नगरपरिषद हद्दीपर्यंत.
प्रभाग क्रमांक 8 -लोकसंख्या- एकूण-4433, अ.जा.- 172, अ.ज.-126. व्याप्ती- अभिनव नगर, एम.एस.ई.बी. कार्यालय, नविन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली. उत्तर- जुनी स्टेट बैंक रोड, नाशिक पुणे हायवे ते ओम साई हॉस्पिटल ते नेहुलकर हॉस्पिटल ते कर्पे हॉस्पिटल ते आनंदऋषी पतसंस्था ते कुलकर्णी यांचे घर ते भिडे यांचे घरामागील खुली जागा ते जोशी यांचे घर ते अभिनवनगर मार्ग ते गुलाब गार्डन आग्नेय कॉर्नर, पावबाकी रोड पर्यंत.

















