संगमनेरात शासकीय अधिकारी राजकीय दडपणाखाली – दिवटे

0
54

संगमनेर नगरपरिषदेतील अस्थिरता वाढली; दहा दिवसांत तीन मुख्याधिकारी बदल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाला स्थैर्याचा लवलेशही उरलेला नाही. गेल्या दहा दिवसांत या पदावर तीन अधिकार्‍यांची उलथापालथ झाली. लातूर येथे आपल्या कार्यकुशलतेने ठसा उमटवणारे आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित रामदास कोकरे यांनी नुकतीच बदली घेऊन संगमनेर सोडले. फ्लेक्सबाजी, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठीचा दबाव आणि कंत्राटदारांच्या टक्केवारीच्या कटू चर्चांनी त्यांना हैराण केल्याचे बोलले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे काम करणे अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःहून बदली मागितल्याची ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यांच्या जागी शिर्डी नगरपरिषदेचे सतीश गणपत दिघे यांना अवघ्या तीन दिवसांसाठी कार्यभार देण्यात आला, आणि मग अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी धनश्री पवार यांची नियुक्ती झाली.

थोडक्यात काय तर संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाच्या बदलीचा तमाशा संगमनेर मध्ये सुरू आहे, मात्र या तमाशामुळे संगमनेर अधोगतीकडे जात आहे, याचा विचार कोण करणार? असा प्रश्‍न संगमनेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे यांनी उपस्थित केला.
सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर अकोले नगरपंचायत येथे मुख्याधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणार्‍या धनश्री पवार यांच्यावर संगमनेरचा अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल 2025 मध्येच त्यांनी अकोले नगरपंचायतीत कार्यभार स्वीकारलेला आहे. या उलथापालथीमुळे पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि विकासकामे ठप्प झाली असून, शहरवासीय त्रस्त आहेत. नगरपरिषदेप्रमाणेच इतर विभागांची अवस्थाही दयनीय आहे. तहसीलदार सुट्टीवर गेले होते, प्रांताधिकारी अहिल्यानगरला अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निघून गेले, तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनीही मध्येच काढता पाय घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पीआय बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरवासीयांची चिंता: संगमनेर अधोगतीच्या उंबरठ्यावर –
संगमनेरच्या प्रशासकीय अस्थिरतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एकेकाळी जिल्ह्यातील सर्वात विकसित शहर आज राजकीय षडयंत्रांचा बळी ठरत आहे. विकासकामे ठप्प, मूलभूत सुविधांचा खेळखंडोबा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यापूर्वी येथे काम केलेल्या अधिकार्‍यांनी चांगल्या परंपरा रुजवल्या होत्या, पण आता त्या धोक्यात आल्या आहेत. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर संगमनेर अधोगतीच्या खाईत लोटले जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

राजकीय दबाव, शिवीगाळ आणि चुकीच्या कामांसाठी हत्यार म्हणून वापरले जाण्याच्या प्रकारांनी अधिकार्‍यांचा जीव दुखावला आहे. संगमनेरात सुखाचा जीव दुखात घालण्यात अर्थ नाही, अशी भावना अधिकार्‍यांमध्ये पसरली आहे. यामुळे प्रशासकीय पारदर्शकता आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे असा आरोप दिवटे यांनी केला.
संगमनेरात राजकीय अशांतता आणि गढूळ वातावरणाने मर्यादा ओलांडली आहे. धार्मिक कार्यक्रमांपासून ते विकासकामांपर्यंत सर्वच बाबींमध्ये राजकीय हस्तक्षेपाने कहर केला आहे. काही कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांसोबत कर्मचार्‍यांसमोर उद्धट वर्तन केले आहे. फ्लेक्सची बिले थेट अधिकार्‍यांकडे पाठवली जातात, कार्यक्रमांसाठी वर्गणी मागितली जाते, तर कंत्राटदारांच्या टक्केवारीच्या चर्चा आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव यामुळे अधिकार्‍यांचा कामाचा उत्साह संपलेला आहे. खंडणी मागितल्यासारखे प्रकार आणि राजकीय खुन्नस काढण्यासाठी अधिकार्‍यांचा वापर यामुळे संगमनेरात काम करणे म्हणजे आगीच्या खड्ड्यात उडी मारण्यासारखे झाले आहे.

…नाहीतर संगमनेरची समृद्धी संपेल –
संगमनेरकरांना आता स्वतःच एकत्र येऊन या संकटाला तोंड द्यावे लागेल. चांगले आणि खमके अधिकारी मिळवण्यासाठी स्थानिकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. प्रशासकीय स्थैर्य आणि पारदर्शकता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी वाढत आहे. अन्यथा, संगमनेरचा गौरवशाली वारसा आणि विकासाची गती कायमची मंदावेल, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here