नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

0
8

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बसून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका

नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त सत्ताधारी व अपक्ष नगरसेवकांनी बुधवारी थेट मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. संगमनेर सेवा समितीचे सत्ताधारी नगरसेवक शैलेश कलंत्री आणि अपक्ष नगरसेवक योगेश जाजू यांनी नगर परिषदेत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनात बसून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नागरी प्रश्नांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने हा पवित्रा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत माहिती देताना नगरसेवक योगेश जाजू म्हणाले की, म्हाळुंगी नदीच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाला तोंडी तसेच लेखी निवेदन देण्यात आले असून परिसरातील नागरिकांनीही तक्रारी केल्या आहेत. हा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
म्हाळुंगी नदीवर श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्यात गटारीचे पाणी साचत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

जाजू यांनी पुढे सांगितले की, शहरातील स्वच्छता, पथदिवे, गटारी, रिकाम्या प्लॉटमुळे निर्माण होणार्‍या समस्या यांसारख्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक प्रशासनाच्या काळात प्रभावीपणे होताना दिसत नाही. अनेक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असून प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे दर आठवड्याला ठरावीक दिवशी नगरसेवकांच्या उपस्थितीत कामांचा आढावा घेण्याची सक्ती केली पाहिजे, जेणेकरून प्रशासनाला कामात टाळाटाळ करता येणार नाही.
दरम्यान, यापूर्वीही नागरी समस्यांबाबत अनेकदा आवाज उठवूनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. योग्य तो निर्णय न घेतल्यास प्रभागातील नागरिकांसह गटारीच्या पाण्यात बसून आंदोलन करू, तसेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here